Headlines

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ६७ लिपीक पदांच्या भरती प्रक्रियेस प्रारंभ.

इच्छुक व पात्र उमेदवारांनी वेळेत अर्ज सादर करून या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा: मनीष दळवी

सिंधुदुर्ग( प्रतिनिधी) सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ६७ लिपीक पदांच्या भरती प्रक्रियेस प्रारंभ होत असुन इच्छुक व पात्र उमेदवारांनी वेळेत अर्ज सादर करून या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा,असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी केले आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., च्या वतीने यापूर्वी आयबीपीएस (IBPS) या राष्ट्रीय स्तरावरील संस्थेमार्फत लिपीक पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. सदर भरती प्रक्रियेतील निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश देऊन त्यांची नियुक्ती प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आलेली आहे. बँकेस नव्याने मंजूर झालेल्या ६७ लिपीक पदांच्या भरतीसाठी आता देशातील अग्रगण्य व मान्यताप्राप्त संस्था टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) यांच्यामार्फत नवीन भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

या संदर्भात बँक व टीसीएस यांच्यात अधिकृत करार करण्यात आला असून, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) यांच्याकडून कळविण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार दिनांक ३ सप्टेंबर, २०२६ पासून उमेदवारांना ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज दि. १७ सप्टेंबर, २०२६ पर्यंत स्विकारले जातील. तसेच सदरची परीक्षा दि. १८ ऑक्टोबर, २०२६ च्या दरम्याने होणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

टीसीएस ही भारतातील विश्वासार्ह व प्रतिष्ठित संस्था असून, विविध बँका, वित्तीय संस्था, शासकीय विभाग तसेच सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांच्या भरती परीक्षा यशस्वीपणे आयोजित करण्याचा त्यांना व्यापक अनुभव आहे. सदर भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक, गुणवत्ताधिष्ठीत व संघणकीकृत पद्धतीने राबविण्यात येणार आहे. भरती प्रक्रियेत इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन अर्ज सादर करावा लागणार असून, त्यानंतर टीसीएसमार्फत संगणकाधारीत (Online) परीक्षा घेण्यात येईल. परीक्षेतील गुणवत्तेनुसार पात्र उमेदवारांची निवड करून बँकेतील मंजूर ६७ लिपीक पदे भरली जाणार आहेत.

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही जिल्ह्यातील अग्रगण्य सहकारी वित्तीय संस्था असून, ग्राहकाभिमुख सेवा व आधुनिक बँकिंग सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. वाढत्या व्यवसायाचा विस्तार, ग्राहक सेवेत अधिक परिणामकारकता आणि शाखांच्या कामकाजातील कार्यक्षमता वाढविण्याच्या उद्देशाने ही भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

भरती प्रक्रिये संदर्भातील सविस्तर जाहिरात, पात्रता, वयोर्मादा, अर्ज शुल्क, परीक्षा पद्धती, अभ्यासक्रम व इतर अटी-शर्ती याबाबतची माहिती बँकेच्या www.sindhudurgdcc.bank.in या अधिकृत संकेतस्थळावर (वेबसाईट) लवकरच उपलब्ध होणार आहे. इच्छुक उमेदवारांनी दिनांक १ सप्टेंबर, २०२६ नंतर बँकेची अधिकृत वेबसाईट नियमितपणे तपासत रहावे. जेणेकरून भरती प्रक्रियेसंदर्भातील सर्व अद्ययावत सूचना, जाहिरात व अर्ज प्रक्रियेची माहिती वेळेत प्राप्त होईल.

इच्छुक व पात्र उमेदवारांनी वेळेत अर्ज सादर करून या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी केले आहे.

You cannot copy content of this page