युवा नेते विशाल परब यांच्याकडून भगिनींसाठी स्नेहमय रक्षाबंधन सोहळा:माजगाव नाका येथील भाजप जनसंपर्क कार्यालयात भावनिक कौटुंबिक वातावरण..
⚡सावंतवाडी,ता. २८-: रक्षाबंधनाच्या निमित्ताने राखीच्या धाग्यातून भाऊ-बहिणीच्या नात्यातील प्रेम, विश्वास आणि आपुलकीचा प्रत्यय सावंतवाडीत आला. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील भगिनींशी असलेला स्नेह आणि विश्वासाचा ऋणानुबंध अधिक दृढ करण्यासाठी भाजपचे राज्य युवा नेते विशाल प्रभाकर परब यांच्या वतीने माजगाव नाका येथील भाजप जनसंपर्क कार्यालयात कौटुंबिक रक्षाबंधन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
शुक्रवारी सकाळी ११ वाजता झालेल्या या सोहळ्यास मतदारसंघातील भगिनींनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. यावेळी भगिनींनी विशाल परब यांना राखी बांधून रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या. राजकीय औपचारिकतेपेक्षा भाऊ-बहिणीच्या जिव्हाळ्याच्या नात्याला अधिक महत्त्व देणारे भावनिक वातावरण यावेळी पाहायला मिळाले.
“मतदारसंघातील भगिनी माझ्यासाठी केवळ मतदार नसून कुटुंबाचा एक भाग आहेत. त्यांच्या सुख-दुःखात भावाप्रमाणे सदैव सोबत राहण्याचा माझा प्रयत्न राहील,” अशी भावना विशाल परब यांनी व्यक्त केली.
रक्षाबंधन हा केवळ राखी बांधण्याचा उत्सव नसून प्रेम, विश्वास, काळजी आणि एकमेकांच्या पाठीशी सदैव उभे राहण्याच्या वचनाचा दिवस आहे. याच भावनेतून भगिनींच्या हातून राखी बांधून घेत विशाल परब यांनी या प्रेमाच्या बंधनाला कायम जपण्याचा संकल्प केला.
या उपक्रमामुळे राजकारणापलीकडे जाऊन जनतेशी असलेले नाते अधिक घट्ट करण्याचा प्रयत्न अधोरेखित झाला. उपस्थित भगिनींनीही विशाल परब यांच्या या स्नेहपूर्ण उपक्रमाचे कौतुक केले.
यावेळी मतदारसंघातील सर्व भगिनींनी दिलेल्या प्रेम आणि विश्वासाबद्दल विशाल परब यांनी आभार मानले. भविष्यातही अशाच पद्धतीने कौटुंबिक रक्षाबंधन सोहळ्याचे आयोजन करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
“मनगटावर बांधलेली राखी काही दिवसांनी उतरते; मात्र प्रेमाने बांधलेला विश्वासाचा धागा आयुष्यभर टिकतो,” या भावनेने पार पडलेला हा रक्षाबंधन सोहळा सावंतवाडीच्या राजकीय-सामाजिक वर्तुळात चर्चेचा ठरला.
