गावांचा सर्वांगीण विकास हेच शिवसेनेचे ध्येय : दत्ता सामंत
कुडाळ : निरुखे-पांग्रड परिसरातील मूलभूत प्रश्न आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून निश्चितपणे सोडविले जातील. प्रत्येक गावाचा सर्वांगीण विकास हेच शिवसेनेचे ध्येय असून, ग्रामीण भागातील नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातील, असे प्रतिपादन शिवसेना जिल्हाप्रमुख तथा जिल्हा परिषद उपाध्यक्ष दत्ता सामंत यांनी निरुखे येथे केले.
शिवसेनेच्या वतीने कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांच्या सौजन्याने निरुखे ग्रामपंचायत सभागृहात २०० ग्रामस्थांना एसटी बस सवलतीचे एनसीएमसी कार्ड मोफत वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला शिवसेना जिल्हा सचिव दादा साईल यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य नागेश आईर, भारतीय चर्मकार समाज मुंबई-महाराष्ट्र राज्य अध्यक्ष पंढरी चव्हाण, सरपंच कीर्तिकुमार तेर्से, उपतालुका प्रमुख देवेंद्र नाईक, कुडाळ शहरप्रमुख अभिषेक गावडे, श्रमिक कामगार कल्याणकारी संघटना राज्याध्यक्ष प्राजक्त चव्हाण यांच्यासह प्रथमेश केळबाईकर, किरण नाईक, सत्यवान गुरव, संस्कृती पालव, सिद्धी तेर्से, रिया नाईक, काव्या तेर्से, बाळकृष्ण तेर्से, मुकेश पालव, बी. एल. तेर्से, रामदास करंदीकर, विष्णू नाईक, सुनील परब, सरिता तेर्से, रोशन गावकर, प्रसाद नाईक, बबन मेस्त्री, सुहास तेर्से आदी उपस्थित होते.
दत्ता सामंत म्हणाले की, प्राजक्त चव्हाण यांनी सेवाभावी वृत्तीने आपल्या गावातील गरीब व सर्वसामान्य ग्रामस्थांना एनसीएमसी कार्डचा लाभ मिळावा यासाठी हा उपक्रम आयोजित केला आहे. युवकांनी स्वतःचा वेळ देऊन समाजासाठी अशा प्रकारे काम करणे कौतुकास्पद आहे. जनतेच्या सुख-दुःखात सहभागी होणाऱ्या अशा कार्यकर्त्यांच्या पाठीशी सर्वांनी उभे राहिले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
दादा साईल म्हणाले की, ग्रामीण भागातील जनतेची जीवनवाहिनी असलेली एसटी ही सर्वांची ‘लालपरी’ आहे. एसटीच्या बसेसची कमतरता आणि अन्य समस्या सोडविण्यासाठी आमदार निलेश राणे सातत्याने प्रयत्नशील आहेत. गेल्या दीड वर्षात कुडाळ-मालवण भागात सुमारे २५ एसटी बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. एनसीएमसी कार्डसाठी आकारले जाणारे २०० रुपयांचे नोंदणी शुल्कही मोफत करण्यात आले असून, हा नागरिकांसाठी मोठा दिलासा आहे, असे त्यांनी सांगितले.
आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून निरुखे गावात कोट्यवधी रुपयांची विकासकामे झाली असून, खासदार नारायण राणे, माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, पालकमंत्री नितेश राणे आणि आमदार निलेश राणे यांनी विकासकामांसाठी निधीची कमतरता भासू दिली नाही, असा दावा दादा साईल यांनी केला.
तसेच प्राजक्त चव्हाण हे गावचे सुपुत्र असून, त्यांच्या माध्यमातून ग्रामीण भागात विविध शासकीय योजना व उपक्रमांचे कॅम्प आयोजित करून त्याचा लाभ सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवावा, असे आवाहनही त्यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारत पेंडुरकर यांनी केले.
