२००८च्या शासन परिपत्रकानुसार जात प्रमाणपत्र व पडताळणी प्रक्रिया करण्याच्या सूचना;
उद्योगमंत्री उदय सामंत,आमदार किरण सामंत, यांच्या पाठपुराव्याला यश..
⚡सिंधुदुर्ग दि.२५-: वैश्यवाणी समाजाच्या ओबीसी जात प्रमाणपत्र व जात पडताळणी प्रक्रियेत येणाऱ्या विविध अडचणी दूर करण्यासाठी सन २००८च्या शासन परिपत्रकाप्रमाणे निर्णय घेण्याचे आश्वासन शासनाकडून देण्यात आले आहे. यासंदर्भात मंत्री अतुल भावे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत. आमदार किरण सामंत व उद्योगमंत्री तथा कोकणचे नेते आमदार उदय सामंत यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला या प्रश्नावर महत्त्वपूर्ण यश मिळाले आहे.
वैश्यवाणी समाजाला ओबीसी जात प्रमाणपत्र व जात पडताळणी मिळताना येणाऱ्या अडचणी दूर करून समाजाच्या न्याय्य मागणीला योग्य तो न्याय मिळावा, यासाठी शासन सकारात्मक पावले उचलत असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले.
येत्या एक महिन्याच्या कालावधीत ‘हिंदू वैश्यवाणी’ आणि ‘वैश्यवाणी’ हे दोन्ही उल्लेख एकच असल्याचे स्पष्ट करून, त्यानुसार ओबीसी जात प्रमाणपत्र व जात पडताळणीची प्रक्रिया करण्यात येणार असल्याचे आश्वासन देण्यात आले.
बैठकीस सिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाजाचे अध्यक्ष सुनील भोगटे, सिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाज पतसंस्थेचे संचालक ॲड. समीर प्रमोद वंजारी, संचालक उमेश वाळके, कणकवली, रत्नागिरी जिल्हा वैश्य समाजाचे अध्यक्ष विकास शेटये, प्रशांत शेटये, विकास संसारे, भिंगार्डे तसेच अन्य समाजबांधव उपस्थित होते.
यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी वैश्यवाणी समाजाच्या ओबीसी जात प्रमाणपत्र व जात पडताळणी प्रक्रियेत येणाऱ्या अडचणींबाबत समाजाची भूमिका ठामपणे मांडली. या महत्त्वपूर्ण प्रश्नावर शासनाने सकारात्मक निर्णय घेऊन त्याची तातडीने अंमलबजावणी करावी, अशी मागणी करण्यात आली.
समाजाच्या हक्कासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा केल्याबद्दल आमदार किरण सामंत व उद्योगमंत्री आमदार उदय सामंत यांचे समाजाच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.
