⚡बांदा ता.२५-: कोकणच्या पारंपरिक खाद्यसंस्कृतीची गोडी थेट कॅलिफोर्नियातील बे एरियात पोहोचवत मूळच्या हळवल (ता. कणकवली) येथील सायली गुरव यांनी महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला. महाराष्ट्र मंडळ बे एरिया आयोजित ‘गौरी खेळ’ कार्यक्रमांतर्गत झालेल्या ‘पाक-कला’ स्पर्धेत त्यांनी सादर केलेल्या ‘पाइनएप्पल फ्युजन मोदका’ला द्वितीय क्रमांक मिळाला.
गेली आठ वर्षे गुरव कुटुंबीय अमेरिकेत स्थायिक असूनही सायली यांनी कोकणच्या पारंपरिक खाद्यपदार्थांची नाळ जपली आहे. पारंपरिक मोदकाचा आकार, लूक आणि अस्सलपणा कायम ठेवत त्यांनी त्यामध्ये अननसाचा हवाईयन स्वाद मिसळत अभिनव ‘पाइनएप्पल फ्युजन मोदक’ साकारला. पारंपरिकतेला आधुनिकतेची जोड देणाऱ्या या प्रयोगाला स्पर्धेत विशेष दाद मिळाली.
प्रसिद्ध सेलिब्रिटी मास्टर शेफ वैभव सावंत यांच्या हस्ते सायली यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी लोकप्रिय अभिनेत्री अश्विनी भावे, विद्या करंजीकर तसेच फ्रेमोंट शहराचे महापौर यांची प्रमुख उपस्थिती होती.
महाराष्ट्र मंडळ बे एरियाच्या माध्यमातून परदेशात महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती, परंपरा आणि कला जपण्याचे काम सातत्याने केले जात आहे. या व्यासपीठावर कोकणच्या पारंपरिक मोदकाला नावीन्याची जोड देत सायली गुरव यांनी मिळवलेले यश विशेष कौतुकास्पद ठरले आहे. कॅलिफोर्नियाच्या भूमीवर कोकणच्या मोदकाची गोडी पोहोचवून महाराष्ट्राचा मान उंचावल्याबद्दल सायली यांचे हळवलसह कणकवली आणि सिंधुदुर्ग परिसरातून अभिनंदन होत आहे.
कोकणच्या मातीतला स्वाद सातासमुद्रापार पोहोचविणाऱ्या सायली गुरव यांच्या या यशामुळे सिंधुदुर्गाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
फोटो:-
कॅलिफोर्निया येथे आयोजित पाककला स्पर्धेत द्वितीय क्रमांक विजेत्या सायली गुरव यांना गौरविताना मान्यवर.
‘पाइनएप्पल फ्युजन मोदका’ला कॅलिफोर्नियात द्वितीय क्रमांक…
