बांदा/प्रतिनिधी
इन्सुली येथील नूतन माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना कोकण गोरत्न फाऊंडेशनच्या वतीने विविध क्रीडा साहित्याचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये क्रीडाविषयक आवड निर्माण व्हावी, त्यांना खेळासाठी आवश्यक साधने उपलब्ध व्हावीत आणि त्यांच्या शारीरिक व मानसिक विकासाला चालना मिळावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी कोकण गोरत्न फाऊंडेशनचे अध्यक्ष शैलेश लाड यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून मार्गदर्शन केले. शालेय जीवनात अभ्यासाला जेवढे महत्त्व आहे, तेवढेच महत्त्व खेळालाही आहे. खेळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा शारीरिक विकास होण्याबरोबरच शिस्त, संघभावना, नेतृत्वगुण, आत्मविश्वास आणि निर्णयक्षमता विकसित होते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबत नियमितपणे विविध क्रीडा प्रकारांमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन श्री लाड यांनी केले.
क्रीडा साहित्य उपलब्ध झाल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेच्या मैदानावर विविध खेळांचा सराव करता येणार असून, त्यांच्या क्रीडा कौशल्याला वाव मिळणार आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्येही अनेक क्रीडा गुण असतात; त्यांना योग्य मार्गदर्शन आणि आवश्यक साहित्य मिळाल्यास ते विविध स्तरांवर चमकू शकतात, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
कोकण गोरत्न फाऊंडेशनने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी घेतलेल्या या उपक्रमाचे विद्यालयाच्या वतीने स्वागत करण्यात आले. क्रीडा साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला. या उपक्रमामुळे शाळेतील क्रीडा संस्कृतीला अधिक प्रोत्साहन मिळून विद्यार्थ्यांचा खेळातील सहभाग वाढेल, असा विश्वास मुख्याध्यापक श्री शेवाळे यांनी व्यक्त केला.
यावेळी व्यासपीठावर मनोज साळगावकर, मुख्याध्यापक संजय शेवाळे, विनोद चव्हाण, दिगंबर मोर्ये, सचिन पालकर, अंजली सावंत, पांडुरंग मिशाळ, श्री आजगावकर, विशाखा पालव आदी उपस्थित होते. फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांचे विद्यालयाच्या वतीने आभार मानण्यात आले.
फोटो:-
इन्सुली माध्यमिक शाळेत मुलांना क्रीडा साहित्य वाटप करताना मान्यवर, मुख्याध्यापक व शिक्षक.
इन्सुली नूतन माध्यमिक विद्यालयात क्रीडा साहित्य वाटप
