Headlines

सावंतवाडीत दोन दिवसीय ‘रानभाज्या महोत्सवा’चा उत्साहात शुभारंभ…

महिला व बालकल्याण समितीचा पुढाकार; नैसर्गिक रानभाज्या व गावठी वस्तूंना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद..

⚡सावंतवाडी ता.२५-: सावंतवाडी नगरपरिषद कार्यालयाच्या प्रांगणात महिला व बालकल्याण समितीच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय ‘रानभाज्या व गावठी वस्तू महोत्सवा’चा शुभारंभ नगराध्यक्ष युवराज्ञी श्रद्धा सावंत-भोसले यांच्या हस्ते करण्यात आला. महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी स्थानिक नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

पावसाळ्यात निसर्गात नैसर्गिकरीत्या उगवणाऱ्या औषधी व पौष्टिक रानभाज्यांची ओळख नव्या पिढीला व्हावी, तसेच त्यांच्या आरोग्यदायी गुणधर्मांबाबत जनजागृती व्हावी, या उद्देशाने २५ व २६ ऑगस्ट रोजी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी नगराध्यक्ष श्रद्धा सावंत-भोसले यांनी विविध स्टॉलला भेट देत विक्रेत्यांशी संवाद साधला. त्यांनी रानभाज्यांची माहिती जाणून घेतली तसेच स्वतः गावठी भाज्यांची खरेदी करून या उपक्रमाला प्रोत्साहन दिले.
पावसाळ्याच्या दिवसांत डोंगराळ व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणाऱ्या रानभाज्यांना पारंपरिक आहारामध्ये महत्त्वाचे स्थान आहे. मात्र, बदलत्या जीवनशैलीमुळे नव्या पिढीला या नैसर्गिक खाद्यपदार्थांची माहिती कमी होत आहे. ही परंपरा जतन करण्याबरोबरच रानभाज्यांचे पौष्टिक व औषधी महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न या महोत्सवाच्या माध्यमातून करण्यात येत आहे.
महोत्सवात विविध प्रकारच्या रानभाज्या तसेच स्थानिक पातळीवर तयार करण्यात आलेल्या गावठी वस्तूंचे स्टॉल उभारण्यात आले आहेत. या स्टॉलना नागरिकांनी भेट देऊन स्थानिक उत्पादने व रानभाज्यांची खरेदी करावी, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.या उपक्रमामुळे ग्रामीण महिला व स्थानिक विक्रेत्यांना बाजारपेठ उपलब्ध होण्याबरोबरच नागरिकांना पारंपरिक, पौष्टिक आणि नैसर्गिक खाद्यपदार्थांची ओळख होण्यास मदत होत आहे.

या कार्यक्रमाचे आयोजन महिला बालकल्याण सभापती दिपाली दिलीप भालेकर यांनी केले होते यावेळी महिला बालकल्याण सभापती दिपाली भालेकर नियोजन सभापती आनंद नेवगी आरोग्य सभापती सुधीर
आडीवरेकर पाणीपुरवठा सभापती प्रतीक बांदेकर उपसभापती सुनीता पेडणेकर नगरसेविका दुलारी रांगणेकर नीलम नाईक सुकन्या टोपले शर्वरी धारगळकर स्नेहा नाईक मान्यवर उपस्थित होते

You cannot copy content of this page