Headlines

जिल्ह्यात उद्यापासून ऑनलाईन खत विक्रीस प्रारंभ…

‘फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल’ प्रणालीमुळे खत खरेदी अधिक सुलभ व पारदर्शक होणार..

⚡सिंधुदुर्ग,ता.२४-: जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वेळेवर, वाजवी दरात आणि सहजतेने अनुदानित रासायनिक खते उपलब्ध व्हावीत, यासाठी केंद्र शासनाच्या ‘फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल’ (FFS) या डिजिटल प्रणालीची अंमलबजावणी जिल्ह्यात २५ ऑगस्ट २०२६ पासून करण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यासह ९ जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे. या प्रणालीमुळे खत विक्री प्रक्रियेत सुलभता व पारदर्शकता येण्यासोबतच अनधिकृत साठेबाजी आणि कृत्रिम तुटवड्याला आळा बसण्यास मदत होणार आहे.
‘फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल’ हे मोबाईल आधारित ॲप असून ते गुगल प्ले स्टोअरवरून डाउनलोड करता येणार आहे. या ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना घरबसल्या आपल्या मोबाईलवरून जवळच्या खत विक्री केंद्रावरील उपलब्ध खतसाठ्याची माहिती मिळणार आहे. तसेच QR कोड आणि टोकन क्रमांकाच्या माध्यमातून खताची ऑनलाइन नोंदणी व बुकिंग करता येणार आहे. सद्यस्थितीत दुकानामध्ये खतसाठा उपलब्ध आहे किंवा नाही, याची माहिती घेण्यासाठी शेतकऱ्यांना प्रत्यक्ष विक्री केंद्रावर जावे लागते. त्यामुळे होणारा वेळ व श्रमाचा अपव्यय नवीन प्रणालीमुळे टाळता येणार आहे. ऑनलाइन खत बुकिंग केल्यामुळे शेतकऱ्यांना रांगेत उभे राहण्याचा त्रास कमी होऊन खत खरेदी अधिक सुलभ होणार आहे.
शेतकऱ्याने QR कोडद्वारे खताची मागणी नोंदवल्यानंतर संबंधित QR कोड तीन दिवसांसाठी वैध राहणार आहे. बुक केलेला खतसाठा संबंधित कृषी सेवा केंद्रात पुढील तीन दिवस त्या शेतकऱ्याच्या नावाने राखीव ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकरी आपल्या सोयीनुसार तीन दिवसांच्या कालावधीत संबंधित कृषी सेवा केंद्रावर जाऊन खत खरेदी करू शकणार आहे.
शेतकऱ्यांना आवश्यक असलेल्या खताचीच मागणी नोंदवता येणार असल्याने इतर अनावश्यक खतांची खरेदी करण्याची सक्ती होण्यास प्रतिबंध होणार आहे. या प्रणालीमुळे खत विक्री व्यवस्थेत पारदर्शकता वाढण्यासोबतच खतांच्या उपलब्धतेबाबतची अचूक माहिती शेतकऱ्यांना वेळेत मिळणार आहे.
खत खरेदी करताना अथवा FFS ॲप हाताळताना काही अडचण किंवा तक्रार असल्यास शेतकऱ्यांनी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे यांनी केले आहे.
00000

You cannot copy content of this page