अवाणिज्य वाहनांना टोलमाफीचा फलक:व्यावसायिक वाहनांना ५० टक्के सवलत..
⚡कणकवली ता.२१-: मुंबई – गोवा महामार्गावरील ओसरगाव टोल नाक्यावर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाहनधारकांना दिलासा देणारी महत्त्वाची बाब समोर आली आहे. सिंधुदुर्ग पासिंग असणाऱ्या अवाणिज्य वाहनांसाठी स्वतंत्र आरक्षित लेनचा फलक टोल नाक्यावर लावण्यात आला आहे. त्यामुळे पालकमंत्री नीतेश राणे यांनी जिल्हावासीयांसाठी जाहीर केलेल्या सवलतीच्या अंमलबजावणीबाबत निर्माण झालेल्या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे.
ओसरगाव येथे टोल वसुली सुरू करण्याबाबतची अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर पालकमंत्री नीतेश राणे यांनी २३ जून रोजी आपल्या वाढदिवसानिमित्त जिल्हावासीयांसाठी विशेष सवलतीची घोषणा केली होती. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एमएच-०७ पासिंगच्या वाहनांसाठी स्वतंत्र लेन उपलब्ध करून देण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले होते. याशिवाय जिल्ह्यातील पिवळ्या नंबर प्लेटच्या व्यावसायिक वाहनांना टोलमध्ये ५० टक्के सवलत देण्याची घोषणाही करण्यात आली होती.
मात्र, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडून काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध करण्यात आलेल्या सूचनेमध्ये सिंधुदुर्गातील अवाणिज्य वाहनांना स्वतंत्रपणे टोलमाफी मिळणार असल्याचा स्पष्ट उल्लेख नसल्याने या घोषणेच्या अंमलबजावणीबाबत प्रश्न उपस्थित झाले होते. या वाहनांसाठी मासिक ३५० रुपयांचा पास उपलब्ध असल्याचे सूचनेत नमूद करण्यात आले होते. त्यामुळे पालकमंत्र्यांनी जाहीर केलेली स्वतंत्र लेन आणि सवलत प्रत्यक्षात कशी लागू होणार, याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले होते.
दरम्यान, ओसरगाव टोल नाक्यावर १७ ऑगस्टपासून टोल वसुली सुरू करण्याचे नियोजन होते. मे. स्कायलार्क इन्फ्रा इंजीनियरिंग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडे टोल वसुलीचे काम देण्यात आले आहे. मात्र काही तांत्रिक कारणांमुळे प्रत्यक्ष टोल वसुलीची सुरुवात पुढे ढकलण्यात आली आहे.
टोल वसुली अद्याप सुरू झालेली नसली तरी संबंधित कंपनीकडून आवश्यक तयारी सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अवाणिज्य वाहनांसाठी आरक्षित लेनचा फलक ओसरगाव टोल नाक्यावर लावण्यात आला आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांनी केलेल्या घोषणेनुसार एमएच – ०७ पासिंगच्या अवाणिज्य वाहनांसाठी स्वतंत्र मार्ग उपलब्ध होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
यासोबतच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पिवळ्या नंबर प्लेटच्या व्यावसायिक वाहनांना ५० टक्के टोल सवलत देण्याची तरतूदही करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील स्थानिक वाहनधारकांना ओसरगाव टोल नाक्यावर दिलासा मिळणार आहे.
टोल वसुली प्रत्यक्षात सुरू झाल्यानंतर या सवलतीची अंमलबजावणी कशा पद्धतीने होते, याकडे आता वाहनधारकांचे लक्ष लागले आहे. मात्र स्वतंत्र लेनचा फलक लावण्यात आल्याने पालकमंत्री नीतेश राणे यांनी जाहीर केलेल्या सवलतीबाबतचा संभ्रम दूर झाला असून जिल्ह्यातील वाहनचालकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.
