आमदार दीपक केसरकर:एमबीबीएस डॉक्टरांची भरती, आरोग्य केंद्रांच्या दुरुस्तीचे निर्देश..
⚡सावंतवाडी.ता.२१-:
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील जनतेला चांगल्या दर्जाच्या आरोग्य सुविधा मिळण्यासाठी आरोग्य विभागाने मतदारसंघातील सर्व रिक्त पदांचा डेटा सादर करावा, यासंदर्भात आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासोबत बैठक घेऊन रिक्त पदांचा प्रश्न त्वरित मार्गी लावला जाईल, असे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर यांनी स्पष्ट केले. सावंतवाडी नगरपरिषदेच्या बॅरिस्टर नाथ पै सभागृहात आयोजित सावंतवाडी विधानसभा एकात्मिक आरोग्यवर्धिनी समितीच्या बैठकीत ते बोलत होते.
या बैठकीला जिल्हा परिषद आरोग्य सभापती प्रितेश राऊळ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी, सभापती सुस्मिता जाधव, जिल्हा परिषद सदस्य संजय गावडे, सुदन कवठणकर, विलास नाईक, विजय नाईक, अपर्णा सातोस्कर, सुजाता पडवळ, नगरसेवक सुधीर आडिवरेकर, वेंगुर्ले नगराध्यक्ष राजन गिरप, जिल्हा आरोग्य अधिकारी लळीत, तहसीलदार श्रीधर पाटील, वेंगुर्ले तहसीलदार ओंकार ओतारी, राहुल गुरव, वेंगुर्ले गटविकास अधिकारी व्ही. एन. नाईक, सावंतवाडी गटविकास अधिकारी निलेश जाधव, सुकन्या टोपले यांच्यासह इतर पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.
बैठकीच्या सुरुवातीलाच सावंतवाडीच्या मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाच्या जागेचा प्रलंबित प्रश्न निकाली लावल्याबद्दल आमदार दीपक केसरकर यांचा जिल्हा परिषद आरोग्य सभापती प्रितेश राऊळ, माजी नगरसेवक राजू मसुरकर आणि रुग्ण कल्याण कृती समितीचे एन. बी. रेडकर यांनी अभिनंदन ठराव मांडून सत्कार केला. यावेळी जागेच्या मुद्द्यावर स्पष्टीकरण देताना आमदार केसरकर म्हणाले की, उपजिल्हा रुग्णालयाची ही जागा मूळची शासनाचीच असून सातबारावर महाराष्ट्र शासन असा उल्लेख आहे. त्यातील ५० गुंठे जागा शासनाच्या स्तरावर विशेष बाब म्हणून निर्णय घेऊन राजघराण्याला देण्यात आली. या रखडलेल्या प्रक्रियेसाठी त्यांनी सकारात्मक प्रतिज्ञापत्र दिल्याने हा मार्ग मोकळा झाला.
सामाजिक कार्यकर्ते राजू मसुरकर यांनी या जागेबाबत आणि डॉक्टरांच्या पगाराबाबत मांडलेल्या भूमिकेवर उत्तर देताना केसरकर यांनी सांगितले की, शासनाचीच जागा पुन्हा विकत घेणे अयोग्य ठरेल, मात्र रुग्णालयाच्या इमारतीच्या तळमजल्यावर पार्किंगची व्यवस्था केली जाईल आणि आराखडा मंजूर करताना याला प्राधान्य दिले जाईल.
बैठकीत मतदारसंघासह जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेच्या विविध समस्यांवर सविस्तर चर्चा झाली. जिल्ह्यातील बहुतांश आरोग्य केंद्रांत डॉक्टरांची पदे रिक्त असून काही ठिकाणी आरोग्य कर्मचारीच उपलब्ध नाहीत, त्यामुळे रुग्णांना तालुक्याच्या ठिकाणी धाव घ्यावी लागते. दोडामार्ग येथील रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देऊनही तेथे पदे भरली गेलेली नाहीत, तर मळेवाड आणि रेडी आरोग्य केंद्रात शवविच्छेदनाची सोय नाही. शिरोडा उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन कक्ष असले तरी तेथील कर्मचाऱ्यांची भाषा अत्यंत उद्धट असल्याची तक्रार सुदन कवठणकर यांनी केली. तसेच वेंगुर्ले येथे स्त्रीरोगतज्ज्ञ नसल्याने प्रसूती सेवा ठप्प असल्याचे आमदार केसरकर यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले.
या सर्व तक्रारींची दखल घेत आमदार केसरकर यांनी आरोग्य केंद्रांच्या रचनेत काही बदल सुचवले. कुंभवडेसह अन्य काही आरोग्य केंद्रे जवळच्या केंद्रांना जोडण्याचे प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश त्यांनी दिले. प्राथमिक आरोग्य केंद्रांतील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निवासाची दुरवस्था झाली असून त्यांना बाहेरून ये-जा करावी लागते, त्यामुळे या शासकीय निवासस्थानांची लवकरात लवकर दुरुस्ती करण्याचे निर्देश देण्यात आले. जिल्ह्यात एमबीबीएस डॉक्टर नसल्याने सर्व भार बीएमएस डॉक्टरांवर पडत असल्याने तात्काळ एमबीबीएस डॉक्टरांची भरती करण्याची मागणी करण्यात आली.
आमदार केसरकर यांनी महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा आढावा घेतला तसेच सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील त्रुटी व अपुऱ्या सुविधा त्वरित पूर्ण करण्याचे आदेश दिले. आरोग्य केंद्रांतील त्रुटी आणि कर्मचाऱ्यांच्या कमतरतेबाबतचा परिपूर्ण अहवाल जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी तात्काळ सादर करावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
