मराठी पत्रकार परिषदेच्या ८२ व्या वर्धापन दिनानिमित्त पत्रकारांसाठी आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

*पत्रकारांनी ताणतणाव मुक्त जीवन जगण्यासाठी करावे मेडिटेशन- डॉ. बालाजी पाटील

*💫मालवण दि०३-:* आजच्या धकाधकीच्या जीवनात पत्रकारांवर कामाचा व्याप वाढत असल्याने त्यांच्या आयुष्यात ताण तणावाची भर पडत असल्याने पत्रकारांनी स्वतः च्या आरोग्याची काळजी स्वतः घेतली पाहिजे त्यासाठी त्यांनी दैनंदिन जीवनात आपल्यासाठी काही वेळ राखून तणावमुक्त जीवन जगण्यासाठी मेडिटेशन, व्यायाम, योगासने करून शरीराला मानवेल अशी जीवन शैली आचरणात आणावी असे प्रतिपादन मालवण ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बालाजी पाटील यांनी केले. सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघ आणि मालवण पत्रकार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आज मराठी पत्रकार परिषदेच्या ८२ व्या वर्धापन दिनानिमित्त मालवण तालुक्यातील पत्रकारांसाठी आरोग्य तपासणी शिबीर मालवण ग्रामीण रुग्णालय येथे घेण्यात आले. या शिबिरात पत्रकारांची थायरॉईड, कोलेस्टेरॉल, मधुमेह, रक्त तपासणी, हृदयविकार, किडनीचे विकार, वात विकार, रक्तदाब आदी विकारांची तपासणी करण्यात आली. तसेच ईसीजी, एक्सरे व कोविड तपासणी करण्यात आली. या शिबिरात पत्रकारांना जाणवणारा मानसिक ताणतणाव, मधूमेह, रक्तदाब आणि हृदय विकार याविषयावर डॉ.बालाजी पाटील आणि त्यांचे सहकारी यांनी पत्रकारांना मार्गदर्शन केले. मालवण पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रफुल्ल देसाई यांनी मार्गदर्शकांचे व उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार किशोर महाजन, जिल्हा पत्रकार संघाचे सदस्य विद्याधर केनवडेकर, मालवण पत्रकार समितीचे सचिव प्रशांत हिंदळेकर, उपाध्यक्ष अमित खोत, पी. के. चौकेकर, मनोज चव्हाण, महेश कदम, संग्राम कासले, समीर म्हाडगुत, आपा मालंडकर, महेंद्र पराडकर, नितीन आचरेकर, उदय बापर्डेकर, सिद्धेश आचरेकर, राजेश पारधी आदी उपस्थित होते. यावेळी डॉ. बालाजी पाटील यांनी पत्रकारांच्या आरोग्याची जाणीव ठेवत मालवण पत्रकार समितीने आयोजित केलेल्या आरोग्य तपासणी शिबिराच्या उपक्रमाचे कौतुक केले. तसेच पत्रकारांच्या आरोग्याच्या दृष्टीने यापुढेही आपले सहकार्य लाभेल असे सांगितले. यावेळी डॉ. आत्माराम सामंत यांनी पत्रकारांना बातमीच्या निमित्ताने विविध ठिकाणी धावपळ करावी लागते. यामुळे त्यांना भरपूर ताणतणाव जाणवत असतो. यासाठी पत्रकारांनी मेडिटेशन करणे गरजेचे आहे. रोज वेळेवर जेवण करणे, व्यायाम करणे, योगासने करणे याद्वारे पत्रकारांनी आपली प्रकृती सुदृढ ठेवावी. तसेच फास्टफूड व तेलकट पदार्थ खाऊ नये, आहारात भाताचे प्रमाण कमी ठेवणे, शाकाहारी जेवणावर भर देणे आदी गोष्टी पत्रकारांनी पाळल्या पाहिजेत. अन्यथा कोलेस्टेरॉल वाढणे, मधुमेह होणे व इतर विकार होऊ शकतात. आपली काळजी आपणच घेणे आवश्यक असल्याने पत्रकारांनी आरोग्याकडे गंभीरतेने पाहावे व काळजी घ्यावी ते म्हणाले. या आरोग्य शिबिरासाठी डॉ. बालाजी पाटील यांच्यासह डॉ. कपिल मेस्त्री, डॉ. अनिरुद्ध मेहंदळे, डॉ. आत्माराम सामंत, डॉ. जागृती ढोके, एनसीडी समुपदेशक उमेश पेडणेकर, श्री. कोरडे, परिचारिका शीतल तेली, फार्मसिस्ट पूनम मालवणकर, समीक्षा खोत, पूजा चव्हाण, एक्सरे विभागाचे श्री. केळुसकर आदींचे सहकार्य लाभले. शेवटी पत्रकार नंदकिशोर महाजन यांनी सर्वांचे आभार मानले

You cannot copy content of this page