प्रशासनाकडे गुरु कल्याणकर प्रशांत बांदेकर यांची तक्रार:संशयास्पद साठा जप्त करून प्रयोगशाळा तपासणीची मागणी..
बांदा :
सावंतवाडी तालुक्यातील एकात्मिक बालविकास सेवा योजना (ICDS) अंतर्गत अंगणवाड्यांमधून सहा महिने ते पाच वर्षे वयोगटातील बालकांना वितरित करण्यात येणाऱ्या पूरक पोषण आहाराच्या (THR) दर्जाबाबत गंभीर आरोप करण्यात आला आहे. या पोषण आहाराच्या पाकिटांमध्ये तसेच धान्यामध्ये अळ्या, किडे, बुरशी आढळून येत असून दुर्गंधीही येत असल्याचा दावा सामाजिक कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी व नागरिकांनी केला आहे. हा प्रकार बालकांच्या आरोग्याच्या दृष्टीने गंभीर असून प्रशासनाने तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते तथा भाजपा बांदा मंडल उपाध्यक्ष गुरु कल्याणकर आणि बांदा ग्रामपंचायत सदस्य प्रशांत बांदेकर यांनी सावंतवाडी तालुका बालविकास प्रकल्प अधिकारी तसेच अन्न व औषध प्रशासनाकडे निवेदन साद केले. यावेळी सावंतवाडी तालुका अन्न सुरक्षा अधिकारी किरण गावीत यांच्याकडेही निवेदन देण्यात आले.
निवेदनानुसार, सहा महिने ते पाच वर्षे वयोगटातील बालकांना देण्यात येणाऱ्या पूरक पोषण आहारामध्ये अळ्या, किडे व बुरशी आढळून आली आहे. काही आहारातून दुर्गंधी येत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे हा आहार बालकांच्या वापरासाठी अयोग्य असल्याचा आरोप करण्यात आला आहे. अशा निकृष्ट आहाराच्या सेवनामुळे बालकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असल्याने या प्रकरणाची सखोल तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
संपूर्ण संशयास्पद साठा जप्त करा
जिल्ह्यात उपलब्ध असलेला संशयास्पद पोषण आहाराचा साठा तात्काळ जप्त करून त्याचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवावेत, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. तसेच निकृष्ट दर्जाचा पोषण आहार पुरवठा करणाऱ्या संबंधित पुरवठादाराची चौकशी करून दोष आढळल्यास कठोर कारवाई करावी आणि संबंधित पुरवठादाराला काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
बालकांना भविष्यात ताजा, सुरक्षित व पौष्टिक आहार वेळेत मिळावा, यासाठी पोषण आहाराच्या गुणवत्तेवर नियमित देखरेख ठेवावी. तसेच पालक व ग्रामस्थांचा समावेश असलेली स्थानिक देखरेख समिती स्थापन करून आहाराच्या दर्जावर लक्ष ठेवावे, अशी मागणीही करण्यात आली आहे.
सात दिवसांत कारवाईची मागणी
“बालकांच्या आरोग्याशी संबंधित असलेल्या पोषण आहारात अशा प्रकारचा निकृष्टपणा आढळणे अत्यंत गंभीर व संतापजनक आहे. प्रशासनाने सात दिवसांत संबंधित दोषी पुरवठादारावर कठोर कारवाई करावी. अन्यथा तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल,” असा इशारा गुरु कल्याणकर व प्रशांत बांदेकर यांनी दिला.
या निवेदनाच्या प्रती सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच महिला व बालविकास विभागाच्या उपआयुक्त यांनाही पाठविण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रशासन या तक्रारीची दखल घेऊन पोषण आहाराच्या साठ्याची तपासणी व नमुने तपासणीसाठी पाठवते का, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.
