Headlines

शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी सिंधुदुर्गात ‘शाळा बंद’ आंदोलन यशस्वी, ९० टक्के शाळा बंद,

सिंधुदुर्गनगरी ता ९
कार्यरत शिक्षकांवरील टीईटीची अनिवार्यता, पदोन्नती प्रक्रियेतील अटी, संचमान्यतेचे धोरण, बीएलओ कामाची सक्ती, पदवीधर वेतनश्रेणी तसेच आंतरजिल्हा बदली प्रक्रिया सुरू करण्यासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी सर्व प्राथमिक शिक्षक संघटना व्यासपीठाच्या नेतृत्वाखाली गुरुवारी राज्यव्यापी ‘शाळा बंद’ आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे जिल्ह्यातील ९० टक्के शाळा बंद राहिले असल्याचा दावा शिक्षक संघटनांनी केला असून, मोर्चासाठी परवानगी नसल्याने सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मिळून जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले.

येथील पत्रकार सर्व शिक्षक संघटना प्रतिनिधी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी महादेव देसाई, सचिन मदने, विठ्ठल देसाई, तुषार आरोसकर, नामदेव जांभवडेकर, महेश पालव, राजू वज्राटकर, अमोल कांबळे यांच्यासह अन्य शिक्षक पदाधिकारी उपस्थित होते. राज्यातील विविध शिक्षक संघटनांनी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन पुकारले असताना, सिंधुदुर्ग जिल्ह्यातही शिक्षकांनी एकत्र येत आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्य शासनाकडे पाठविले.

जिल्ह्यात ९० टक्के शाळा बंद ठेवून शिक्षक आंदोलनात सहभागी झाले होते. तर १० टक्के शाळांमध्ये शिक्षण सेवक असल्याने त्या शाळा सुरू होत्या. शिक्षक संघटनांनी मांडलेल्या प्रमुख मागण्यांमध्ये विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख आणि मुख्याध्यापक पदोन्नती प्रक्रिया तात्काळ स्थगित करून संबंधित आदेश रद्द करावेत, सन २०१० पूर्वी सेवेत रुजू झालेल्या सेवाज्येष्ठ शिक्षकांसाठी टीईटी उत्तीर्णतेच्या नियमात शिथिलता द्यावी, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून पात्र शिक्षकांना पदोन्नतीची संधी उपलब्ध करून द्यावी, विद्यार्थी व शाळाविरोधी असल्याचा आरोप करण्यात आलेले संचमान्यता धोरण रद्द करावे, प्राथमिक शिक्षकांना बीएलओच्या अशैक्षणिक कामातून पूर्णपणे मुक्त करावे, नियुक्तीपासूनच विषय शिक्षकांना ‘समान काम-समान वेतन’ या तत्त्वानुसार पदवीधर वेतनश्रेणी लागू करावी आणि आंतरजिल्हा बदली प्रक्रिया तातडीने सुरू करावी, अशा मागण्यांचा समावेश होता.

(कोट)
शासनाने शिक्षकांच्या न्याय्य मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष केल्यामुळे राज्यभर आंदोलनाची भूमिका घ्यावी लागली . आमच्या मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय न झाल्यास भविष्यात आणखी तीव्र आंदोलन करू. —संतोष पाताडे, संघटना पदाधिकारी सिंधुदुर्ग,

(बॉक्स)

आंदोलनातील प्रमुख मागण्या

शिक्षकांना बी एल ओ सारख्या शैक्षणिकेतर कामांतून पूर्णपणे मुक्त करावे.
२०१३ पूर्वी नियुक्त शिक्षकांना टी ई टी परीक्षेतून सूट द्यावी.
शिक्षकांच्या पदोन्नती धोरणात अनुभव आणि ज्येष्ठतेला प्राधान्य द्यावे.
टी ई टी परीक्षा अधिक व्यावहारिक आणि शिक्षकाभिमुख करावी.
विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी आवश्यक वेळ द्यावा.
शिक्षकांचे मुख्य काम अध्यापन असून, त्यांना अतिरिक्त शासकीय कामांमधून मुक्त करावे.

(बॉक्स)

शाळा बंद आंदोलनात सक्रिय सहभागी संघटना

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा सिंधुदुर्ग

अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ शाखा सिंधुदुर्ग

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती सिंधुदुर्ग

महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख संघटना सिंधुदुर्ग

महाराष्ट्र राज्य केंद्रप्रमुख संघ सिंधुदुर्ग

महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी महासंघ प्राथमिक शिक्षक संघटना

महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटना सिंधुदुर्ग

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग सिंधुदुर्ग

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ सिंधुदुर्ग

महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटना सिंधुदुर्ग

महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटना सिंधुदुर्ग

महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटना सिंधुदुर्ग

महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक कर्मचारी महासंघ सिंधुदुर्ग

महाराष्ट्र राज्य प्राथमिक व उच्च प्राथमिक मुख्याध्यापक सेवा मंडळ सिंधुदुर्ग

महाराष्ट्र राज्य सत्यशोधक शिक्षक सभा सिंधुदुर्ग

राष्ट्रिय राज्य पुरस्कारप्राप्त शिक्षक संघ ,

(कोट)
जिल्ह्यातील शिक्षक संघटनांनी पुकारलेल्या आजच्या शाळा बंद आंदोलनामुळे जिल्ह्यातील बहुतांशी प्राथमिक शाळा बंद राहिल्या तर काही शाळा नियमित वेळेनुसार सुरू होत्या–प्राथमिक शिक्षण विभाग, जि प सिंधुदुर्ग,

You cannot copy content of this page