Headlines

शिल्पाग्राम परिसरातील खड्ड्यांवरून नगरसेवक संजू परब आक्रमक…

तात्काळ खड्डे बुजवा: दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण..? संजू परब यांचा सवाल; तर संबंधित अधिकाऱ्यांकडून लवकर काम पूर्ण करण्याचे आश्वासन..

सावंतवाडी ता. २७ :
सावंतवाडी शहरातील प्रभाग क्रमांक ७ चे नगरसेवक संजू परब यांनी आज आपल्या प्रभागातील विविध भागांची पाहणी केली. यावेळी शिल्पाग्राम परिसरात गॅस पाईपलाईन व पाण्याच्या पाईपलाईनसाठी खोदण्यात आलेले खड्डे अद्याप बुजविण्यात आले नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या प्रकाराबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने सूचना दिल्या.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर हे खड्डे नागरिकांसाठी धोकादायक ठरू शकतात. एखादी दुचाकी घसरून किंवा एखादे लहान मूल या खड्ड्यात पडून दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असा सवाल नगरसेवक संजू परब यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केला.
यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने कर्मचारी पाठवून हे खड्डे बुजविण्यात येतील, असे आश्वासन श्री. परब यांना दिले. मात्र, कामात कोणतीही दिरंगाई सहन केली जाणार नाही, असे स्पष्ट करत त्यांनी पुन्हा या ठिकाणी पाहणी करणार असल्याचे सांगितले.
“पुन्हा पाहणी करताना काम अपूर्ण आढळल्यास संबंधितांवर कठोर भूमिका घेतली जाईल,” असा इशाराही संजू परब यांनी यावेळी दिला. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याची मागणी त्यांनी केली.

You cannot copy content of this page