डॉ. जयेंद्र परुळेकर यांची मागणी:
चौदा गावांतील ग्रामस्थांना माहिती नसताना हरकतींसाठी कमी कालावधी; १५ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्याची शासनाकडे विनंती..
⚡सावंतवाडी ता.२२-: महाराष्ट्रातील १३ जिल्ह्यांतून प्रस्तावित असलेल्या शक्तीपीठ महामार्गाचा मार्ग सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग आणि सावंतवाडी तालुक्यातील १४ गावांमधून जाणार आहे. या महामार्गाबाबत शासनाने ९ जून २०२६ रोजी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. मात्र, अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतरही संबंधित गावांतील ग्रामस्थांना याबाबत पुरेशी माहिती मिळालेली नसल्याचा आरोप डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी केला आहे.
अधिसूचनेनुसार नागरिकांनी २१ दिवसांच्या आत आपल्या हरकती व सूचना उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयात दाखल करणे अपेक्षित आहे. मात्र, चौदा गावांतील ग्रामस्थ तसेच परिसरातील नागरिकांना याची माहिती नसल्याने हरकती नोंदविण्यासाठी शासनाने १५ ऑगस्ट २०२६ पर्यंत मुदतवाढ द्यावी, अशी मागणी डॉ. परुळेकर यांनी केली आहे.
शक्तीपीठ महामार्गाच्या बांधकामापूर्वी प्रशासनाने संबंधित गावांमध्ये पर्यावरण आघात अहवाल तयार करून जनसुनावणी घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या महामार्गामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता, तसेच वन्यजीवांच्या अधिवासावर होणारा परिणाम याबाबत प्रशासनाने नागरिकांसमोर स्पष्ट माहिती मांडावी, अशी मागणी त्यांनी केली.
वन्यजीव कॉरिडॉर बाधित झाल्यास गवे, हत्ती, बिबटे, रानडुक्कर यांसारख्या वन्यप्राण्यांचा मानवी वस्तीत व शेती-बागायती क्षेत्रात वावर वाढून नुकसान होण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी नमूद केले.
“जर हा महामार्ग नागरिकांच्या विकासासाठी आणि प्रगतीसाठी आहे, असा शासनाचा दावा असेल तर चौदा गावांमध्ये जनसुनावणी घेऊन नागरिकांना विश्वासात घेण्यास हरकत नसावी,” असे डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी म्हटले आहे.
