⚡सावंतवाडी, १९ जून २०२६: पर्यावरण संवर्धनाच्या उद्देशाने घे भरारी फाउंडेशन, सावंतवाडी यांच्या वतीने नुकताच तालुका स्कूल शाळा नं. १, सावंतवाडी येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
यावेळी शाळा नं. १ च्या समोरील ग्राउंडमधील उपलब्ध जागेत घे भरारी फाउंडेशनच्या पदाधिकारी व सभासदांनी उपयुक्त अशा विविध देशी रोपांची लागवड केली. चाफा, चिकू, जांभूळ, जाम, सुपारी, अशोक वृक्ष, काजू इत्यादी प्रजातींच्या रोपांची यावेळी लागवड करण्यात आली.
कार्यक्रमप्रसंगी घे भरारीच्या नूतन अध्यक्षा ज्योती दुधवडकर यांनी मुलांना वृक्षारोपणाचे महत्त्व पटवून दिले. वाढते प्रदूषण आणि तापमानवाढ यावर वृक्षारोपण हाच प्रभावी उपाय असल्याचे त्यांनी सांगितले. लावलेल्या रोपांची काळजी शाळा नं. १ मधील विद्यार्थी, शिक्षक आणि घे भरारीतील सर्व सभासद मिळून घेणार आहेत.
सदर कार्यक्रमासाठी तालुका स्कूल शाळा नं. १, सावंतवाडीच्या शिक्षिका व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. घे भरारी फाउंडेशनकडून संस्थापिका मोहिनी मडगावकर, अध्यक्षा ज्योती दुधवडकर, उपाध्यक्षा मेघना राऊळ, कार्याध्यक्षा रिया रेडीज, सेक्रेटरी मेघा डुबळे, खजिनदार मेघना साळगावकर, सल्लागार शारदा गुरव यांच्यासह रेखा कुमटेकर, सलोनी वंजारी, वैष्णवी बांदेकर, संध्या पवार, मनीषा नवांगुळ, दीपा नेवगी, समीक्षा मडगावकर उपस्थित होत्या.
कार्यक्रमाच्या शेवटी घे भरारीच्या प्रत्येक सभासदाने रोप लावून वृक्षारोपणाचा संदेश उपस्थितांना दिला. रोपे जगवण्याची जबाबदारी स्वीकारून पर्यावरण रक्षणाचा संकल्प यावेळी सर्वांनी केला.
