१८५ खातेदारांना मिळणार ६० कोटींचा मोबदला:त्रिपक्ष कराराला शासनाची मान्यता; तीन टप्प्यांत होणार रक्कम वितरण, प्रकल्पामुळे शिरोड्याला आंतरराष्ट्रीय पर्यटन नकाशावर स्थान मिळेल;आमदार दीपक केसरकर..
⚡सावंतवाडी ता.१९-: शिरोडा ताज प्रकल्पाबाबत शासनाने त्रिपक्ष कराराला मान्यता दिली असून या करारानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. १८५ खातेदारांना ६० कोटींची रक्कम तीन टप्प्यांत वितरीत करण्यात येणार असून या प्रकल्पामुळे शिरोडा गावात क्रांती होत आंतरराष्ट्रीय पातळीवर गावाचे नावलौकिक होईल असा विश्वास माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त केला.
माजी मंत्री, आम. केसरकर म्हणाले, शिरोडा ताज प्रकल्पाबाबत महत्वाची बैठक आज झाली. या बैठकीत समितीच्या सदस्यांसह प्रांताधिकारी, वेंगुर्ला तहसीलदार, ताज गृपचे प्रतिनिधी, भू-मापन अधिकारी, वेळागर समितीचे प्रतिनिधी उपस्थित होते. शासनाने त्रिपक्ष कराराला मान्यता दिली असून ताज गृप, महाराष्ट्र पर्यटन महामंडळ व स्थानिक समितीत हा करार होणार आहे. या करारानंतर एमटीडीसी व ताज गृपच्या जॉईंट अकाउंटला पैसे जमा होणार असून त्यानंतर ते पैसे लोकांना मिळणार आहेत. त्यावेळीच्या भूसंपादनावेळी काही जणांनी पैसे स्वीकारले नव्हते. त्यात आता नव्या दराने पैसे स्थानिक शेतकऱ्यांना दिले जाणार असून त्यांनी पैसे स्वीकारावे. मयत लोकांचा वारस तपास करून घ्यावा, त्यांनाही हे पैसे दिले जातील. हा मोबदला सर्वांना मिळणार असून १८५ खातेदारांना ही रक्कम मिळणार आहे. ६० कोटीची रक्कम तीन टप्प्यांत वितरीत करण्यात येणार आहे. ताज गृपचा हा प्रश्न तांत्रिक बाबींच्या अडचणींमुळे रखडला होता. आता तो सुटला असून स्थानिकांना विश्वासात घेऊन ही प्रक्रिया राबविण्यात आली आहे. नोकर भरतीत देखील स्थानिकांना प्राधान्य दिले जाणार असून जमीनी गेलेल्या लोकांना देखील तिथे सामावून घेतलं जाणार आहे. २ एकर जागा पर्यटनासाठी ग्रामपंचायतीला दिली जाणार आहे. पुढच्या बैठकीत सरपंच, उपसरपंच असणार असून ५२ हेक्टर जागा दिली आहे. वाद असणाऱ्या जागा वगळण्यात आल्या असून त्याबाबत स्वतंत्र बैठका घेतल्या जातील. यासाठी पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई, पालकमंत्री नितेश राणे, शिरोडा ग्रामपंचायत, ताज गृपन मदत केल्याने शिरोडा गावात क्रांती होईल, आंतरराष्ट्रीय पातळीवर गाव येईल असा विश्वास आम. केसरकर यांनी व्यक्त केला.
यावेळी माजी आमदार शंकर कांबळी, शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, तालुकाप्रमुख दिनेश गावडे आदी उपस्थित होते
