Headlines

मच्छिंद्रनाथ कांबळी नाट्यगृहाच्या नूतनीकरणाचा आमदार निलेश राणे यांच्या हस्ते शुभारंभ…

पहिल्या टप्प्यातील १० कोटींच्या कामाचे भूमिपूजन:उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून कुडाळ आणि मालवण नाट्यगृहासाठी २६ कोटी मंजूर..

⚡कुडाळ ता.१८-: येथील मच्छिंद्रनाथ कांबळी नाट्यगृहाच्या पहिल्या टप्प्यातील नूतनीकरण व उर्वरित कामाचा शुभारंभ आज आमदार निलेश राणे यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाला. नगरविकास विभागाच्या विशेष निधीतून या कामासाठी १० कोटी रुपयांचा निधी पहिल्या टप्प्यासाठी देण्यात आला आहे. या पहिल्या टप्प्यात नाट्यगृहाची स्टेज व्यवस्था, अत्याधुनिक साउंड सिस्टम आणि दर्जेदार बैठक व्यवस्था यांसह विविध कामे केली जातील, अशी ग्वाही नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर यांनी दिली. आमदार निलेश राणे यांनी हा निधी मिळवून दिल्याबद्दल नगराध्यक्षांनी त्यांचे विशेष आभार मानले.
याप्रसंगी बोलताना आमदार निलेश राणे म्हणाले, हे केवळ नावापुरते भूमिपूजन नसून, पहिल्या टप्प्यातील १० कोटींच्या कामांनंतर लगेचच ३.५ कोटींचा दुसरा टप्पा सुरू होईल. उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आम्ही जेव्हा विनंती केली, तेव्हा त्यांनी एका मिनिटात मालवण येथील नाट्यगृह आणि कुडाळचे मच्छिंद्रनाथ कांबळी नाट्यगृह या दोन्हींसाठी मिळून २६ कोटी रुपयांचा निधी पास केला. नगरपंचायतीने हे काम अत्यंत व्यवस्थित आणि चांगल्या दर्जाचे केले पाहिजे. जर कोणी काम कमी खर्चात उरकण्याचा किंवा दर्जा खालावण्याचा प्रयत्न करत असेल, तर ते हाणून पाडा. तसेच कामात कोणी अडथळा आणल्यास थेट स्टिंग ऑपरेशन करा; कारण हा माझ्या कुडाळवासीयांचे हक्काचे पैसे आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः पाहणी केल्याबद्दल आमदारांनी त्यांचे आभार मानले.
कुडाळच्या भविष्यातील विकासाचा रोडमॅप मांडताना आमदार राणे म्हणाले की, केवळ कुडाळ शहरात १२० कोटी रुपयांची विकासकामे होणार आहेत. कुडाळ एमआयडीसी येथे रणजी क्रिकेट खेळता येईल असे अद्ययावत मैदान तयार केले जाईल. रत्नागिरीत उभारलेल्या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सपेक्षाही मोठे आणि भव्य स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स सिंधुदर्गात उभे राहणार आहे. याशिवाय घनकचरा व्यवस्थापन, आधुनिक मच्छी मार्केट आणि मुख्य रस्त्यांच्या विकासासाठी आमचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. लोकांनी विश्वासाने आपल्याला निवडून दिले आहे, त्यामुळे शहरवासीयांच्या अपेक्षा लक्षात घेऊनच काम करा.
कुडाळ शहरासाठी तयार करण्यात आलेल्या टी. पी. प्लॅनसाठी सर्वात कमी हरकती कुडाळ शहरातून आल्या आहेत, हे लोकांच्या विश्वासाचे प्रतीक आहे. ज्या काही हरकती आल्या आहेत, त्यांचे निवारण केले जाईल, असे सांगतानाच आमदार राणे यांनी प्रशासनाला सज्जड दम दिला. माझं प्रत्येक कामावर बारीक लक्ष आहे. विकासाच्या आड येणाऱ्यांची गय केली जाणार नाही. कुडाळ हे महाराष्ट्रातील एक आदर्श शहर बनले पाहिजे आणि त्याची चर्चा संपूर्ण राज्यात झाली पाहिजे, हाच आमचा ध्यास आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी २०१४ ते २०२४ या कालखंडाचा दाखला देत सांगितले की, आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून कुडाळ-मालवण तालुक्याला १०० कोटींपेक्षा जास्त भरघोस निधी मिळाला आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून जिल्ह्यात मोठी विकासकामे झाली आहेत. जनतेने या सर्व कामांचा परतावा आगामी निवडणुकीत मतांच्या रूपाने दिला पाहिजे. तसेच मुख्याधिकाऱ्यानी या कामाचा दर्जा राखण्याकडे विशेष लक्ष द्यावे आणि आलेला निधी पूर्णपणे योग्य कामासाठी खर्चित व्हावा, अशी सूचनाही त्यांनी केली.
या कार्यक्रमाला जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, शिवसेना उपनेते संजय आंग्रे, संजय पडते, जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष दादा साईल, संजय करलकर, तालुकाप्रमुख विनायक राणे, नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर, उपनगराध्यक्ष किरण शिंदे प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच नगरसेवक संध्या तेरसे, नयना मांजरेकर, उदय मांजरेकर, श्रुती वर्दम, आफ्रिन करोल, अक्षता खटावकर, विलास कुडाळकर, अभिषेक गावडे, ज्योती जळवी, राजीव कुडाळकर, निलेश परब आणि बंड्या सावंत यांच्यासह कुडाळमधील नागरिक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page