तौक्ते नंतर १६ दिवसांनी वीज पुरवठा सुरु;किल्ले रहिवाशांत समाधान
मालवण दि प्रतिनिधी तौक्ते चक्रीवादळामुळे गेले दोन आठवडे खंडित असलेला मालवणच्या सागरातील किल्ले सिंधुदुर्ग वरील वीज पुरवठा सुरळीत करण्याच्या दृष्टीने वीज वितरण कंपनीने आज सकाळपासून सोळा जणांची टीम कामाला लावल्यानंतर रात्री उशिरा किल्ले सिंधुदुर्ग वरील वीज पुरवठा सुरळीत होऊन किल्ला लख्ख प्रकाशाने उजळून निघाला तौक्ते चक्रीवादळामुळे मालवणच्या सागरातील किल्ले सिंधुदुर्गला मोठा तडाखा बसला असून किल्ले सिंधुदुर्ग वरील वीज पुरवठा विजेचे खांब पडल्याने खंडित झाला होता. तर किल्ल्यातील शिवराजेश्वर मंदिरावर वडाचे झाड पडून मंदिराचे अंशतः नुकसान झाले होते. तसेच भवानी मंदिर आणि महापुरुष मंदिरावरील छप्परही उडून गेले होते. याशिवाय किल्ल्यातील रहिवाशांच्या घरांचीही नासधूस झाली होती. एवढे होऊनही याठिकाणी वीज वितरणचे अधिकारी अथवा महसूल विभाग पोहोचला नव्हता खंडित वीज पुरवठ्या बाबत आमदार वैभव नाईक, खासदार विनायक राऊत यांचेही किल्ल्यातील रहिवाशी मंगेश सावंत आणि श्रीराम सकपाळ यांनी लक्ष वेधले होते.तसेच किल्ल्यातील वीज पुरवठा खंडित झाल्याची माहिती माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांनाही मिळाली होती. त्यानंतर शिवसेना भाजपच्या या नेत्यांनी किल्ल्यातील वीज पुरवठा सुरळीत होण्याच्या दृष्टीने वीज वितरणच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली होती. दोनच दिवसापूर्वी वीज वितरणचे अधिकारी श्री. परदेशी आणि श्री. मलानी हे दोघे सिंधुदुर्ग किल्ल्यावर पाहणी करण्यासाठी आले होते. आज वीज वितरणचे ठेकेदार श्री. नलावडे यांनी आपली सोळा जणांची टीम घेऊन भल्या पहाटे विजेचे पोल व इतर साहित्य घेऊन सिंधुदुर्ग किल्ला गाठला. वीज पोलांची वाहतूक व साहित्य किल्ल्यावर नेण्यासाठी रामा धुरत याने बहुमोल सहकार्य केले. रात्री उशिरा किल्ले सिंधुदुर्ग वरील वीज पुरवठा सुरळीत झाल्याने सिंधुदुर्ग किल्ला विजेच्या लख्ख प्रकाशाने उजळून निघाला होता.
