तांत्रिक अडचणींमुळे मनस्ताप..
⚡कणकवली ता.११-: एसटीच्या सवलत दरातील प्रवासासाठी आवश्यक असलेल्या NCMC कार्डाचा लाभ मिळविण्यासाठी कणकवली बस स्थानकात गुरुवारी सकाळपासून प्रवाशांनी मोठी गर्दी केली होती. मात्र ऑनलाइन नोंदणीसाठी सकाळी ११ वाजेपर्यंतच कालावधी उपलब्ध असल्याचे समोर आल्याने अनेक प्रवाशांना ताटकळत उभे राहावे लागले. कार्ड नोंदणीसाठी केवळ एकच मशीन कार्यान्वित करण्यात आल्याने प्रक्रिया संथ गतीने सुरू होती. त्यातच वारंवार नेटवर्कची समस्या आणि मशीनमध्ये येणारे तांत्रिक बिघाड यामुळे नागरिकांचा खोळंबा झाला. सकाळपासून रांगेत उभे राहूनही अनेकांना वेळेत नोंदणी करता आली नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली.
याबाबत विभाग नियंत्रक दीपक घोडे यांच्याशी संपर्क साधला असता, सवलत दराच्या NCMC कार्डाची नोंदणी व वितरण प्रक्रिया खाजगी कंपनीमार्फत राबविण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही यासाठी येणाऱ्या अडचणींची माहिती घेऊन त्यावर योग्य तो तोडगा काढण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.
दरम्यान, NCMC कार्डासाठी वाढती गर्दी लक्षात घेता नोंदणी प्रक्रियेसाठी अतिरिक्त सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे. नागरिकांना तासंतास प्रतीक्षा करावी लागू नये यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
