दुकाने सील करण्याच्या ताकिदीची चर्चा; व्यापारी वर्ग सतर्क..
⚡देवगड ता.१७-:
देवगड तालुक्यातील मुख्य महामार्गावरील प्रमुख बाजारपेठांमधील काही दुकानांमध्ये अन्न व औषध प्रशासनाचे कर्मचारी कागदपत्रांसह आवश्यक बाबींची तपासणी करीत असल्याचे वृत्त पसरताच व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली होती. मात्र, संबंधित कर्मचाऱ्यांकडून कोणत्याही प्रकारच्या ठोस कारवाईचा पवित्रा घेण्यात आला नसला तरी या कथित प्रकाराची उलटसुलट चर्चा व्यापाऱ्यांमध्ये रंगली होती.
बुधवारी दुपारच्या सत्रात देवगड- नांदगाव या मुख्य महामार्गावरील बाजारपेठांमध्ये अन्न व औषध प्रशासनाचे दोन कर्मचारी तपासणी करीत असल्याची कुजबुज व्यापाऱ्यांमध्ये सुरू झाली होती. बाजारपेठांमधील खाद्यपदार्थांच्या काही स्टॉलवर या कर्मचाऱ्यांनी भेट देत संबंधित दुकानदारांच्या कागदपत्रांचीही तपासणी केली. आवश्यक कागदपत्रांची महिन्याभरात पूर्तता न केल्यास दुकाने सील करण्याची ताकीदही संबंधित दुकानदारांना त्या कर्मचाऱ्यांकडून देण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे. दरम्यान, या प्रकारामुळे व्यापाऱ्यांमध्ये काही काळ खळबळ उडाली होती. तसेच या कथित प्रकाराची उलटसुलट चर्चाही बाजारपेठांसह शहरांमध्ये रंगली होती.
