नगराध्यक्षा श्रद्धा सावंत भोसले यांची माहिती: नळ पाणी योजनेतील त्रुटी दूर करून काम पूर्ण करणार ;सभापती प्रतीक बांदेकर..
⚡सावंतवाडी ता.१७-: शहरातील जिमखाना मैदानावरील जागा वापराबाबत ग्रो बीग टेक्नॉलॉजीला पुढील मुदतवाढ न देण्याचा निर्णय सावंतवाडी नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला आहे. भाजप, शिवसेना, उबाठा शिवसेना आणि काँग्रेसच्या नगरसेवकांनी एकमताने मुदतवाढ न देण्याचा ठराव मंजूर केल्याची माहिती नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली.
जिमखाना मैदानावरील इमारत ही ऐतिहासिक वस्तुसंग्रहालय व कलादालनासाठी आरक्षित असून रोजगाराच्या दृष्टीने कंपनीला केवळ १५ दिवसांसाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली होती. मात्र, मुदत संपल्यानंतरही दीड महिन्याहून अधिक काळ जागेचा वापर सुरू होता. तसेच एका खोलीच्या वापरासाठी परवानगी असताना दोन खोल्यांचा वापर केल्याचे निदर्शनास आल्याने सभागृहाने मुदतवाढ नाकारल्याचे नगराध्यक्षा भोसले यांनी स्पष्ट केले.
“रोजगाराला आमचा विरोध नाही. नगरपरिषदेच्या माध्यमातूनही रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, नगरपरिषदेच्या मालमत्तेचा नियमबाह्य वापर होऊ देता येणार नाही,” असे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी लाड पागे योजनेंतर्गत २७ जणांना नगरपरिषदेत सामावून घेतल्याची माहितीही दिली.
नळपाणी योजनेतील त्रुटी दूर करून काम पूर्ण करणार
दरम्यान, ५७ कोटी रुपयांच्या नळपाणी योजनेत भ्रष्टाचार झाल्याच्या आरोपांवर पाणीपुरवठा सभापती प्रतीक बांदेकर यांनी स्पष्टीकरण दिले. माहितीच्या अधिकारातून झालेल्या आरोपांनंतर कामाची तपासणी करण्यात आली असून ज्या ठिकाणी त्रुटी आढळल्या त्या दुरुस्त करून घेण्याचे आदेश ठेकेदाराला देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
“ही योजना सावंतवाडी शहराची मूलभूत गरज आहे. शहराला अधिकाधिक पाणी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. शक्यतो ही योजना गुरुत्वाकर्षण पद्धतीवर चालवण्याचे नियोजन आहे,” असे बांदेकर म्हणाले.
धरणावरून सुरू असलेले काम कोलगावपर्यंत पोहोचले असून पावसाळ्यानंतर डांबरीकरणाची कामे पूर्ण करण्यात येणार आहेत. कामाच्या गुणवत्तेवर पीएमसी तसेच नगरपरिषदेचे अभियंते लक्ष ठेवून असल्याचेही त्यांनी सांगितले. पूर्णवेळ मुख्याधिकारी व पाणीपुरवठा अभियंता उपलब्ध झाल्यानंतर कामाला अधिक गती मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
घनकचरा व्यवस्थापनावर भर; प्लास्टिकमुक्त शहराचा संकल्प
सर्वसाधारण सभेत घनकचरा व्यवस्थापन, पार्किंग व्यवस्था आणि सांडपाणी पुनर्वापर प्रकल्पाबाबतही चर्चा करण्यात आली. शहरात नवीन बॉटल क्रशर मशीन बसवण्यात आली असून प्लास्टिकमुक्त सावंतवाडी करण्यासाठी विविध उपाययोजना राबवण्यात येणार असल्याचे नगराध्यक्षांनी सांगितले.
कापडी पिशव्यांना प्रोत्साहन देण्यासाठी पाच रुपयांत पिशवी उपलब्ध करून देणारी यंत्रणा उभारण्यात आली आहे. तसेच सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पासाठी शासनाचा नवीन जीआर प्राप्त झाला असून पुढील कार्यवाहीचा आढावा घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शहराच्या सीमाभागात होणाऱ्या कचऱ्याच्या समस्येवर शेजारील गावांच्या सरपंचांसोबत बैठक घेऊन उपाययोजना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गावठी आठवडा बाजार आणि राजभाजी महोत्सव सुरू करण्याचाही प्रयत्न असल्याचे नगराध्यक्षा भोसले यांनी सांगितले.
यावेळी आरोग्य सभापती सुधीर आडीवरेकर यांनी ग्रामीण भागातील वाढत्या कचरा समस्येवर भाष्य केले. शेजारील गावांमध्ये घनकचरा व्यवस्थापनासाठी जागेची उपलब्धता नसल्याने ग्रामपंचायतींना आवश्यक मार्गदर्शन करण्यात येणार असून याबाबत पालकमंत्री व आमदारांचे लक्ष वेधले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेला नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोसले, पाणीपुरवठा सभापती प्रतीक बांदेकर, आरोग्य सभापती सुधीर आडीवरेकर, पर्यटन सभापती मोहिनी मडगावकर, नियोजन सभापती आनंद नेवगी, महिला व बालकल्याण सभापती दिपाली भालेकर यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते.
