उपनगराध्यक्ष निरवडेकर आक्रमक:
विषयसूचीतील घोळावरून संजू परब संताप; ग्रो बीग टेक्नॉलॉजीला मुदतवाढीचा ठराव नामंजूर..
⚡सावंतवाडी ता.१७-: शहराच्या भवितव्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेल्या सांडपाणी व्यवस्थापन व पुनर्वापर प्रकल्पाच्या रखडलेल्या पाठपुराव्यावरून सावंतवाडी नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत प्रशासनाला विरोधकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. तीन मासिक सभांमध्ये ठराव होऊनही प्रशासनाकडून अपेक्षित हालचाल होत नसल्याने उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांनी मुख्याधिकाऱ्यांना धारेवर धरत, “हा प्रकल्प प्रशासनाकडून हलक्यात घेतला जातोय का?” असा सवाल उपस्थित केला.
नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले यांच्या अध्यक्षतेखाली लोकमान्य टिळक सभागृहात झालेल्या सभेत विविध विषयांवर जोरदार चर्चा झाली. सुरुवातीलाच विषयसूचीच्या प्रतींमध्ये तफावत असल्याचा मुद्दा माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी उपस्थित करत प्रशासनाला जाब विचारला. सत्ताधाऱ्यांना १० विषयांची तर विरोधकांना ९ विषयांची विषयसूची देण्यात आल्याचा प्रकार समोर आल्यानंतर विरोधकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाबाबत बोलताना ॲड. निरवडेकर म्हणाले की, सावंतवाडी शहराच्या अस्मितेशी संबंधित असलेल्या या प्रकल्पासाठी सभागृहाने वारंवार ठराव केले आहेत. मात्र प्रशासनाकडून त्याचा योग्य पाठपुरावा होत नाही. याबाबत मुख्याधिकाऱ्यांनी अधिकृत पत्रव्यवहार सभागृहात सादर करावा, अशी मागणी त्यांनी केली. मुख्याधिकाऱ्यांनी शासन नियुक्त एजन्सीशी संपर्क साधल्याचे सांगितले असता, केवळ फोनवरील चर्चेवर प्रकल्प पुढे जाणार नाही, असे सांगत त्यांनी प्रशासनाला सुनावले.
यावेळी नगरसेवक अजय गोंदावळे यांनीही या योजनेचे महत्त्व अधोरेखित करत ॲड. निरवडेकर यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला. नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले यांनी या विषयाकडे गांभीर्याने पाहिले जाईल, असे स्पष्ट केले.
दरम्यान, ग्रो बीग टेक्नॉलॉजी कंपनीच्या मुदतवाढीच्या विषयावरूनही सभेत जोरदार खडाजंगी झाली. कंपनीकडून नगरपरिषदेची बदनामी करण्यात आल्याचा आरोप करत सत्ताधारी गटातील सभापती आनंद नेवगी व सुधीर आडिवरेकर यांनी मुदतवाढ देण्यास विरोध केला. तर रोजगाराचा मुद्दा असल्याने काही नगरसेवकांनी मुदतवाढ देण्याची मागणी केली. अखेर चर्चेनंतर कंपनीला मुदतवाढ न देण्याचा निर्णय नगराध्यक्षा भोंसले यांनी जाहीर केला.
सभेत बाळासाहेब ठाकरे ज्ञानप्रबोधिनी, भटक्या कुत्र्यांचा प्रश्न, नगरपरिषदेच्या मालमत्तांचा ताबा, तसेच आरोग्य सुविधांबाबतही चर्चा झाली. शहरात अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान गोवा यांची ओपीडी सुरू करण्यासाठी नगरपरिषदेची जागा देण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. या निर्णयाचे नगरसेवकांनी स्वागत केले.
आयत्यावेळीच्या विषयात नगरपरिषदेच्या उत्पन्नावरून संजू परब यांनी प्रशासनाला लक्ष्य केले. शिल्पग्राम प्रकल्पासाठी दिलेली १ कोटी रुपयांची अनामत रक्कम दहा वर्षांनंतरही वसूल का झाली नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच व्यापारी संकुलातील थकीत भाडे वसुलीचा मुद्दाही त्यांनी मांडला.
सभेला नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले, उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, प्रभारी मुख्याधिकारी विनायक औंधकर, विविध सभापती व नगरसेवक उपस्थित होते.
