तालुक्यातील घटना: ग्रामस्थ आक्रमक, संजू परब, वैभव नाईक ,रुपेश राऊळ ,यांच्या मध्यस्थीनंतर प्रकरण शांत..
⚡सावंतवाडी, ता.१६-:
तालुक्यातील एका गावात खाजगी कंपनीकडून मायनिंगसाठी सुरू असलेला ड्रोन सर्वे ग्रामस्थांच्या विरोधानंतरही करण्यात आल्याने नाराजी व्यक्त होत आहे. ग्रामस्थांनी या सर्वेला विरोध दर्शवत ड्रोन खाली पाडला तसेच संबंधित कंपनीच्या कर्मचाऱ्यांना जाब विचारत धक्काबुक्की केल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत ग्रामस्थांनी पोलिसांना माहिती दिली, मात्र उशिरा त्यांचा जबाब नोंदवण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, मायनिंग संदर्भातील काम करणाऱ्या एका कंपनीला हा सर्वे करण्याचे आदेश वरिष्ठ स्तरावरून मिळाले असून त्यानुसार सर्वेक्षण सुरू आहे.
सावंतवाडी-वेंगुर्ला तालुक्यातील तब्बल २१ गावांमध्ये हा सर्वे केला जाणार असल्याची माहिती काही सरपंचांनी दिली आहे. मात्र या सर्वेक्षणाबाबत स्थानिक प्रशासन किंवा ग्रामस्थांना कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे.
ग्रामस्थांना विश्वासात न घेता सर्वेक्षण केले जात असल्याचा आरोप करत स्थानिकांनी याबाबत आक्षेप नोंदवला आहे. दरम्यान, या प्रकरणाची अधिकृत माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच सावंतवाडीचे शिंदे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब, ठाकरे शिवसेनेचे माजी आमदार वैभव नाईक विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांनी घटनास्थळी धाव घेत माहिती घेतली. दरम्यान आक्रमक झालेल्या ग्रामस्थांना अखेर तिघांनी मिळून मध्यस्थी करून प्रकरण शांत केलं.
