श्री. प्रितेश राऊळ ; वेंगुर्ला तालुका – शहरात शाळा प्रवेशोत्सव उत्साहात संपन्न..
⚡वेंगुर्ला ता.१५-: वेंगुर्ला तालुक्यात तसेच शहरात जि. प. शाळा प्रवेशोत्सव 2026 उत्साहात संपन्न झाला. यावेळी जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती प्रितेश राऊळ यांच्यासह नूतन लोकप्रतिनिधी, अधिकारी वर्ग यांनी सर्व प्रमुख शाळात उपस्थिती दर्शविल्याने
वेंगुर्ला तालुका शहरात शाळा प्रवेशोत्सव उत्साहात संपन्न झाला. यावेळी
विद्यार्थ्यांनी आई-वडील यांचे आदर्श समोर ठेऊन शिक्षण घ्यावे, असे प्रतिपादन प्रितेश राऊळ यांनी केले. दरम्यान “रेडी गावचे सुपुत्र ” प्रितेश शंकर राऊळ हे सलग दुसऱ्यांदा सिंधुदुर्ग जिल्हा परिषद शिक्षण सभापती झाल्याने वेंगुर्ला तालुक्यात शैक्षणिक क्षेत्रात आणखी प्रगतीस वाव मिळणार असल्याने आज संपूर्ण वेंगुर्ला तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रातून उत्साहपूर्ण वातावरण होते. दि.15 जून 2026 रोजी जि.प. पू. प्राथमिक श्री जैतीर विद्यालय तुळस येथे शाळेचा पहिला दिवस विद्यार्थ्यांच्या स्वागताने अगदी आनंदात साजरा करण्यात आला.
सोमवारी विद्यालयात पार पडलेल्या या समारोहास अध्यक्ष म्हणून वेंगुर्ला पंचायत समिती सभापती शंकर घारे उपस्थित होते. तसेच तुळस ग्रामपंचायत सरपंच रश्मी परब, उपसरपंच सचिन नाईक, ग्रामपंचायत सदस्य जयवंत तुळसकर आणि शाळेचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष महादेव मेस्त्री आदी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती मातेच्या पूजनाने झाली. मान्यवरांच्या हस्ते शाळेत नव्याने दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. पहिलीच्या वर्गात दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांचे औक्षण करून त्यांच्या पावलांचे ठसे घेण्यात आले. तद्नंतर सभापती शंकर घारे यांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके ,दप्तर आणि गणवेश याचे वाटप करण्यात आले. आपल्या अध्यक्षीय भाषणात सभापती श्री. घारे यांनी विद्यार्थ्यांना आपल्या जीवनातील शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले आणि भविष्यात आपण खूप यश संपादन करावे, अशा शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमास तुळस आरोग्य केंद्राचे कर्मचारी, आशासेविका तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ व पालक, शाळेचे मुख्याध्यापक संतोष सावंत, सहशिक्षक प्रज्ञा भगत, तारामती गोसावी, वैजनाथ गडदे आदी उपस्थित होते. तालुक्यात
प्रभातफेरी, विद्यार्थ्यांचे औक्षण, पहिले पाऊल ठसा, खाऊ वाटप, मोफत पाठ्यपुस्तक व गणवेश वाटप करण्यात आले. शालेय भौतिक सुविधांसाठी नेहमीच सहकार्य राहील, असे आश्वासन आडेली पं. स. सदस्य नितीन मांजरेकर यांनी व शालेय विकासासाठी जिल्हा परिषद स्तरावरून सर्वतोपरी प्रयत्न करणार असे आश्वासन जि. प. सदस्य विजय नाईक यांनी आडेली येथील कार्यक्रमात बोलताना दिले. शिक्षण सभापती प्रितेश राऊळ यांनी तालुक्यासह वेंगुर्ला शहरातही शाळांमध्ये उपस्थिती दर्शविली. यावेळी त्यांचा सत्कारही करण्यात आला. यावेळी नगरसेवक उपस्थित होते.
