सावंतवाडी शहरातील तीन ठिकाणी सीसीटीव्ही कार्यान्वित;नगरसेवक देव्या सूर्याजी यांच्या मागणीला यश..
⚡सावंतवाडी ता.१५-: शहरातील ज्या सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जातो, अशा कचऱ्याच्या ‘हॉटस्पॉट’वर आता सावंतवाडी नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाकडून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर ठेवली जाणार आहे. उपनगराध्यक्ष तथा प्रभारी नगराध्यक्ष अनिल निरवडेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्वसाधारण सभेत नगरसेवक देव्या सूर्याजी यांनी ही महत्त्वपूर्ण मागणी मांडली होती. या मागणीची आरोग्य विभागाने तातडीने दखल घेत शहरात तीन मुख्य ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत.
शहरातील कचऱ्याची समस्या दूर करण्यासाठी आणि उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर पुराव्यानिशी कारवाई करण्यासाठी आरोग्य विभागाने तात्काळ पावले उचलली आहेत. या अंतर्गत प्राथमिक टप्प्यात चेतन नेवगी यांच्या घराशेजारील पाणंद, कोठावळे पाणंद, सबनिसवाडा येथील सार्वजनिक शौचालय परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करण्यात आलेत.
सर्वसाधारण सभेत पहिल्यांदाच हा विषय लावून धरुन सातत्याने पाठपुरावा सुरू होता.ज्या ठिकाणी नागरिक किंवा व्यावसायिक मोठ्या प्रमाणावर कचरा टाकतात, तिथे सीसीटीव्ही बसवल्यास कचरा टाकणाऱ्यांवर कायदेशीर आणि दंडात्मक कारवाई करणे सोपे होईल. यामुळे शहरात उघड्यावर कचरा टाकण्याचे प्रमाण निश्चितच कमी होईल आणि स्वच्छतेला हातभार लागेल असा विश्वास नगरसेवक देव्या सुर्याजी यांनी व्यक्त केला. तसेच मागणीची तत्परतेने दखल घेऊन शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविल्याबद्दल तत्कालीन प्र. नगराध्यक्ष ॲड.अनिल निरवडेकर तसेच सावंतवाडी नगरपरिषद प्रशासन व न.प.आरोग्य विभागाचे श्री. सुर्याजी यांनी आभार मानले आहेत.
