आंबोलीतील धोकादायक वृक्ष छाटणीला सुरुवात…

सरपंच सावित्री पालेकर यांच्या मागणीला यश:घाटातील दरड, तुटलेले संरक्षक कठडे व धोकादायक झाडांबाबत तातडीच्या उपाययोजनांची मागणी..

⚡आंबोली, ता. १५-:
आंबोली परिसरातील धोकादायक वृक्षांमुळे निर्माण झालेला अपघाताचा धोका लक्षात घेता आंबोलीच्या माजी सरपंच तथा प्रशासक सौ. सावित्री पालेकर यांनी केलेल्या मागणीला यश आले आहे. राष्ट्रीय महामार्ग विभाग व वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आंबोली गाव हद्दीतील धोकादायक झाडांची छाटणी करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

या कार्यवाहीबद्दल नागरिकांकडून संबंधित विभागांचे आभार व्यक्त करण्यात येत आहेत.
दरम्यान, आंबोली घाट परिसरात अद्यापही अनेक धोकादायक झाडे असून ती तातडीने हटविण्याची गरज आहे. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित असलेल्या रस्त्यालगतच्या धोकादायक वृक्षांचीही छाटणी करण्यात यावी, अशी मागणी सौ. सावित्री पालेकर यांनी केली आहे.
आंबोली घाटातील श्री देव पूर्वीचा वस मंदिराच्या पुढील बाजूस दरड कोसळण्याची शक्यता निर्माण झाली असून मोठे दगड पडण्याच्या स्थितीत आहेत. यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने राष्ट्रीय महामार्ग विभागाने तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच आंबोली घाटातील अनेक संरक्षक कठडे तुटलेल्या अवस्थेत असून त्यांची त्वरित दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. आगामी मान्सून पर्यटनाच्या पार्श्वभूमीवर आंबोली परिसरात मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी होणार आहे. पाऊस, धुके आणि निसरडे रस्ते यामुळे अपघाताचा धोका वाढू शकतो. त्यामुळे प्रशासनाने वेळीच खबरदारीच्या उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

You cannot copy content of this page