⚡कणकवली ता.१५-: कणकवली शहरातील सुतारवाडी-निमेवाडी परिसरात साकारण्यात येणाऱ्या सुमारे एक कोटी रुपये खर्चाच्या ‘श्री स्वयंभू नमो उद्यान’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे भूमिपूजन कणकवली नगरपंचायतीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले.
यावेळी बोलताना नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी सांगितले की, कणकवली शहरात विविध विकासकामे प्रस्तावित असून त्याचाच एक भाग म्हणून आधुनिक सुविधांनी सुसज्ज उद्याने उभारली जात आहेत. या उद्यानाच्या माध्यमातून परिसरातील नागरिकांना आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध होणार असून ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा, संवाद आणि आरोग्यदायी उपक्रमांसाठी स्वतंत्र जागा निर्माण होणार आहे.
या उद्यानामध्ये लहान मुलांसाठी विविध खेळ साहित्य, नागरिकांसाठी मनोरंजनाच्या सुविधा तसेच परिसराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या विविध उपक्रमांचा समावेश करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांना दर्जेदार सार्वजनिक सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
तसेच शहरातील विविध भागांत आणखी अद्ययावत व आधुनिक उद्याने उभारण्याचा नगरपंचायतीचा मानस असून, आगामी काळात कणकवली नगरपंचायत विकासाच्या दृष्टीने भरीव कामगिरी करताना दिसेल, असा विश्वासही पारकर यांनी व्यक्त केला.
या भूमिपूजन कार्यक्रमास कणकवली नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष सुशांत नाईक, मुख्याधिकारी गौरी पाटील, माजी आमदार राजन तेली, नगरसेवक संकेत नाईक, लुकेश कांबळे, दिवाकर मुरकर, महेश कोदे तसेच प्रशासन अधिकारी अमोल अगम यांच्यासह मान्यवर व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
