१ कोटी ३६ लाखांचा मुद्देमाल जप्त:बीड येथील चालकावर गुन्हा दाखल..
⚡बांदा, ता. १३-: बांदा पोलीसांनी चेकनाक्यावर कारवाई करत गोवा बनावटीच्या दारूची मोठी खेप पकडली. या कारवाईत १४ चाकी ट्रकसह तब्बल १ कोटी ३६ लाख ६० हजार ७१६ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, याप्रकरणी एका चालकाविरोधात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत संदीपान जाधव (वय ३१, सध्या रा. वाघोली, पुणे; मूळ रा. बीड) हा अशोक लेलँड कंपनीच्या १४ चाकी ट्रकमधून (क्रमांक एमएच २७ बीएक्स ९०९९) गोवा बनावटीची दारू वाहतूक करत असल्याचे आढळून आले. ही कारवाई १३ जून रोजी पहाटे १.३० वाजण्याच्या सुमारास बांदा चेकनाक्यावर करण्यात आली.
या ट्रकमधून ‘या लेबलचे १८० मिली क्षमतेच्या बाटल्यांचे १३१४ बॉक्स आढळले. त्यामध्ये एकूण ६३ हजार ७२ बाटल्या असून त्यांची किंमत सुमारे ८० लाख ७३ हजार २१६ रुपये आहे. तसेच ७५० मिली क्षमतेच्या बाटल्यांचे ६२५ बॉक्स मिळाले असून त्यामध्ये एकूण ७ हजार ५०० बाटल्या असून त्यांची किंमत ४० लाख ८७ हजार ५०० रुपये आहे. याशिवाय ट्रकची किंमत १५ लाख रुपये असून एकूण मुद्देमालाची किंमत १ कोटी ३६ लाख ६० हजार ७१६ रुपये आहे.
याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सुशांत हिर्लेकर यांनी फिर्याद दिली असून बांदा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ७२/२०२६ महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५ (अ)(इ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शिवराज झांजुर्णे करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मोहन दहिकर, अपर पोलीस अधीक्षक नवमी साटम यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी सावंतवाडी घनश्याम आढाव यांच्या सूचनेनुसार सहायक पोलीस निरीक्षक पंकज शिंदे, पोलीस उपनिरीक्षक शिवराज झांजुर्णे, हवालदार विलास भोगले, हवालदार तेली, पोलीस कॉन्स्टेबल सुशांत हिर्लेकर, बर्गे यांनी केली. कारवाईस हवालदार मालकर, राजेश गवस, दादा परब, राजाराम कापसे, प्रसाद पाटील व रोहित कांबळे यांनी सहकार्य केले.
