डॉ. विजय जगताप:भोसले फार्मसी कॉलेजमध्ये फार्मसी क्षेत्राच्या व्यापक व्याप्तीवर मार्गदर्शन..
⚡सावंतवाडी ता.१३-: यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीतर्फे बारावी विज्ञान शाखेतून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेले फार्मसी करिअर मार्गदर्शन सत्र आज उत्साहात पार पडले. या सत्रात विद्यार्थ्यांना फार्मसी क्षेत्रातील शिक्षण, करिअर संधी, प्रवेश प्रक्रिया आणि उद्योगक्षेत्रातील रोजगाराच्या विविध पर्यायांबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले._
कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. विजय जगताप उपस्थित होते. त्यांनी फार्मसी क्षेत्राचा उगम, त्याचा आजपर्यंतचा प्रवास, संशोधन, औषध निर्मिती, उत्पादन प्रक्रिया, उपचार पद्धती आणि आरोग्य व्यवस्थेतील फार्मासिस्टची भूमिका याविषयी सोप्या आणि प्रभावी भाषेत माहिती दिली. यावेळी त्यांनी फार्मसी क्षेत्रातील विविध करिअर संधी, अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर उपलब्ध होणारे रोजगाराचे पर्याय तसेच उच्च शिक्षणाच्या संधींबाबत मार्गदर्शन केले. गेल्या अकरा वर्षांत संस्थेतून उत्तीर्ण झालेले विद्यार्थी देश-विदेशातील नामांकित संस्थांमध्ये कार्यरत असल्याची माहितीही त्यांनी विद्यार्थ्यांना दिली.
यानंतर डॉ. विनोद मुळे यांनी प्रवेश प्रक्रियेतील विविध टप्पे, आवश्यक कागदपत्रे, सीईटी सेलमार्फत होणारी प्रवेश प्रक्रिया तसेच विद्यार्थ्यांनी घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे निवेदन सहाय्यक प्रा.गौरी भिवशेट तर आभार प्रदर्शन डॉ.तुषार रुकारी यांनी केले. या सत्रासाठी विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
