नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोसले: “ग्रो बीग खासगी संस्था, सामाजिक नाही; नगरपरिषदेचे उत्पन्न वाढविणे हेच उद्दिष्ट..
सावंतवाडी : ग्रो बीग टेक्नॉलॉजी ही सामाजिक संस्था नसून खासगी कंपनी असल्याने नगरपरिषदेकडून नियमानुसार भाडे आकारणी करण्यात आली आहे. मात्र, संबंधित संस्थेने १५ दिवसांचेच भाडे भरून दीड महिना जागेचा वापर केला असून, एका खोलीची परवानगी घेऊन तीन खोल्यांचा वापर केल्याचा आरोप नगराध्यक्षा युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले यांनी केला. या प्रकरणावरून राजघराण्यावर होत असलेल्या टीकेला त्यांनी तीव्र आक्षेप घेत, गरज पडल्यास मानहानीचा दावा दाखल करण्याचा इशाराही दिला.
नगराध्यक्षा भोंसले यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, नगरपरिषदेच्या मालमत्तेचा योग्य वापर होतो आहे की नाही यावर लक्ष ठेवणे ही नगराध्यक्ष म्हणून माझी जबाबदारी आहे. ग्रो बीग टेक्नॉलॉजीला १५ दिवसांसाठी जागा देण्यात आली होती. त्यासाठी ५० हजार रुपये भाडे व ९ हजार रुपये जीएसटी असा करार करण्यात आला होता. मात्र, दीड महिना उलटल्यानंतरही त्यांनी जागा रिकामी केलेली नाही.
एका खोलीसाठी परवानगी घेऊन तीन खोल्यांचा वापर करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले. याबाबत विचारणा केली असता योग्य माहिती देण्यात आली नसल्याचा आरोप त्यांनी केला. ही सामाजिक संस्था नसून खासगी कंपनी असल्याने नगरपरिषदेच्या उत्पन्नाच्या दृष्टीने भाडे आकारणी करण्यात आली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जिमखाना येथील जागा सांस्कृतिक व वस्तू संग्रहालयासाठी वापरली जात असून, तेथे सुरू असलेल्या कामकाजाची पाहणी करण्यासाठी आपण गेलो होतो. त्यावेळी काही बाबी निदर्शनास आल्याचे त्यांनी सांगितले.
“माझ्यावर टीका करायची असेल तर करा, मात्र राजघराणे आणि कुटुंबावर आरोप करणे योग्य नाही. राजकारणात मी सावंतवाडीच्या विकासासाठी आले आहे,” असेही नगराध्यक्षा म्हणाल्या.
यावेळी त्यांनी विरोधकांना आव्हान देत, आरोपांमध्ये तथ्य असल्यास पुरावे सादर करावेत, असे सांगितले. नगरपरिषदेचे उत्पन्न वाढविणे आणि शहराचा विकास करणे हेच आपले उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मल्टिस्पेशालिटी रुग्णालयाच्या मुद्यावरही त्यांनी भाष्य करत, यासंदर्भात मुंबईत अनेक बैठका झाल्या असून राजघराण्याकडून विविध जागा उपलब्ध करून देण्यात आल्याचे सांगितले. विकासकामांमध्ये अडचणी येत असल्या तरी नगरपरिषदेची टीम नागरिकांच्या सेवेसाठी तत्पर असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी सभापती सुधीर आडीवरेकर, आनंद नेवगी, प्रतिक बांदेकर, मोहीनी मडगावकर, दिपाली भालेकर, नगरसेविका निलम नाईक, दुलारी रांगणेकर, सुकन्या टोपले, सुनिता पेडणेकर आदी उपस्थित होते.
