पावसाळ्यातील साथीच्या आजारांवर प्रभावी उपाययोजना करा…

शिंदे युवा सेनेची मागणी:बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधसाठा, सर्पदंश-रेबीज लसी, पाणी तपासणी व आरोग्य सुविधा वाढविण्याबाबत निवेदन..

⚡बांदा ता.११-: पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर परिसरात उद्भवणाऱ्या विविध साथीच्या व संसर्गजन्य आजारांवर प्रभावी उपाययोजना करण्यात याव्यात, तसेच आरोग्य सुविधांमध्ये आवश्यक वाढ करण्यात यावी, अशी मागणी शिंदे युवा सेनेच्या वतीने बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. गजानन सारंग यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात बांदा दशक्रोशीतील अनेक गावे व वाड्या-वस्त्यांचा समावेश असून पावसाळ्यात विविध आजारांचे व साथीचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे आवश्यक औषधसाठा, प्रतिबंधात्मक उपाययोजना व जनजागृती मोहीम तातडीने राबविण्यात यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रात विविध वैद्यकीय तपासण्या नियमितपणे उपलब्ध करून देण्यात याव्यात. सर्पदंश व रेबीज प्रतिबंधक लसींचा पुरेसा साठा ठेवावा, गरोदर मातांसाठी आवश्यक औषधे, गोळ्या व आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशीही मागणी करण्यात आली.
याशिवाय परिसरातील सर्व सार्वजनिक विहिरींच्या पाण्याची तपासणी करून त्याचा अहवाल तयार करावा. पाण्यात काही त्रुटी आढळल्यास त्यावरील उपाययोजना पूर्वतयारी म्हणून हाती घ्याव्यात, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
यावेळी शिंदे शिवसेना युवा सेना तालुकाप्रमुख रियाज खान, उपतालुकाप्रमुख मोईन खान, विभागप्रमुख राजेश विर्नोडकर, माजी तालुकाप्रमुख भैय्या गोवेकर, पांडुरंग नाटेकर, सैफान खान, राजा खान आदी उपस्थित होते.
डॉ सारंग यांनी यावेळी आरोग्य केंद्रात मुबलक औषधसाठा उपलब्ध असून पावसाळ्यात आवश्यक खबरदारी घेण्याचे आश्वासन पदाधिकाऱ्यांना दिले.
फोटो:-
बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी डॉ गजानन सारंग यांच्याशी चर्चा करताना शिंदे शिवसेनेचे पदाधिकारी.

You cannot copy content of this page