⚡सावंतवाडी ता.०५-: मळेवाड परिसरात मॉन्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावल्याने सर्वांची एकच धावपळ उडाली.
आज सायंकाळ पासून या पावसाने सुरुवात केल्याने रस्त्यावर पाणीच पाणी झाल्याने वाहने चालवताना वाहनधारकांना कसरत करावी लागली तर अचानक सुरू झालेल्या या पावसामुळे काही ठिकाणी प्रवासी आश्रयासाठी दुकाने, बस स्टॉप चा आश्रय घेताना दिसत होते.
सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याच्या बाजूची गटारे साफ न केल्याने पहिल्याच पावसात गटार तुंबल्याने पाणी रस्त्यावर आल्याचे दिसत होते.त्यामुळे रस्त्यावर माती,दगड,प्लास्टिक,कचरा रस्त्यावर आला होता.
पावसाच्या दमदार सुरुवातीमुळे नागरिकांची एकच धांदल उडाली.कोकम,लाकडे, गवत,घरावरील छत ,अन्य कामे करण्यात धावपळ करत असल्याचे दिसत होते.
विद्युत पुरवठ्याचा लपंडाव :- ग्राहक त्रस्त
सध्या दिवसभर विद्युत पुरवठा दररोज खंडित होत असल्याने ग्राहकांत नाराजी पसरली असून,पहिल्याच पावसाच्या सुरुवातीला जर विद्युत पुरवठा असा खंडित होत असला तर पुढे काय ? असा सवाल ग्राहकांकडून केला जात आहे.पावसाआधी सुरक्षिततेच्या दृष्टीने कामे होणे गरजेचे होती मात्र अजून पर्यंत ही कामे अर्धवट स्थितीत असल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने ग्राहकांची विद्युत उपकरणे निकामी होत आहेत.
