⚡देवगड ता.०५-: पर्यावरण संवर्धन, जैवविविधता संरक्षण आणि शाश्वत पर्यटन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत एका नामांकित वृत्तसंस्थेतर्फे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त देण्यात येणारा ‘इको-टुरिझम एक्सलन्स अँड हेरिटेज वॉरियर्स अवॉर्ड – २०२६’ हा प्रतिष्ठेचा पुरस्कार कांदळवन सह व्यवस्थापन समिती, तारामुंबरी यांना जाहीर करण्यात आला आहे.
समितीच्या वतीने अध्यक्ष बबनराव खवले व सदस्य लक्ष्मण तारी हे पुरस्कार स्वीकारणार आहेत. पर्यावरण संरक्षण, कांदळवन संवर्धन तसेच स्थानिक पर्यटन विकासासाठी समितीने केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन हा सन्मान प्रदान करण्यात येत असल्याचे वृत्तसंस्थेकडून कळविण्यात आले आहे.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजित विशेष पुरस्कार सोहळा दि. ६ जून २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजता मुंबईतील रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी येथे संपन्न होणार आहे. या कार्यक्रमात विविध क्षेत्रांत पर्यावरण संवर्धनासाठी योगदान देणाऱ्या संस्था व व्यक्तींना गौरविण्यात येणार आहे.
कांदळवन सहव्यवस्थापन समिती, तारामुंबरी अंतर्गत विकसित करण्यात आलेल्या जगप्रसिद्ध निसर्ग पर्यटन प्रकल्प ‘इको-टुरिझम’ उपक्रमाची राज्यभरात विशेष दखल घेतली जात आहे. स्थानिक रोजगार निर्मिती, पर्यावरण जागृती आणि जैवविविधतेचे संरक्षण यासाठी समितीने राबविलेल्या उपक्रमांमुळे हा पुरस्कार जाहीर झाल्याचे सांगण्यात आले.
या गौरवामुळे तारामुंबरी आणि देवगड तालुक्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
