आमचे स्टॉल हटवल्यास आमच्यावर उपासमारीची वेळ; कारवाई प्रशासकीय मात्र, तोडगा काढू – नगराध्यक्ष संदेश पारकर..
⚡कणकवली ता.०५-:
कणकवली स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे.त्यामुळे कणकवली शहरातील उड्डाणपुलाखालील अनाधिकृत पार्किंग केलेली वाहने , काही स्टॉल, फळे ,भाजी , फुले विक्रेते यांच्यावर कारवाई करण्याबाबत प्रशासन काम करत आहेत .परंतु नरडवे नाका ते म्हस्कर हॉस्पिटल पर्यंत असलेले स्टॉल हे संबंधित मालकांनी तक्रार अर्ज केल्यामुळेप्रशासन कारवाई करत आहे. मुळात येथील स्टॉलधारकांनी फुटपाथवरील अतिक्रमण काढले पाहिजे. कारवाई प्रशासकीय मात्र, तोडगा काढू असे आश्वासन नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी नरडवे रस्त्यालगत असलेल्या स्टॉलधारकांना दिले आहे.
कणकवली नगरपंचायत नगराध्यक्ष दालनात नगराध्यक्ष संदेश पारकर यांची स्टॉलधारकांनी भेट घेत आपल्यावर उपासमारीची वेळ येईल , अशी व्यथा मांडली. यावेळी उपनगराध्यक्ष सुशांत नाईक , नगरसेवक रुपेश नार्वेकर , संकेत नाईक , लुकेश कांबळे , जयेश धुमाळे , तेजस राणे , राजू पेडणेकर , अमजद शेख , योगेश मुंज , पप्पु एकावडे यांच्यासह स्टॉलधारक पुरुष व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी स्टॉलधारकांनी आम्हाला नगरपंचायतने काहीकाळासाठी वेळ द्यावा. पावसाळा तोंडावर आलेला आहे. त्यामुळे आमच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण होईल, अशी व्यथा स्टॉलधारकांनी मांडली. त्यावेळी उपनगराध्यक्ष सुशांत नाईक यांनी स्टॉलधारकांनी सर्वात प्रथम तेथील जमीन मालकांशी संपर्क साधावा . कारण , फुटपाथच्या बाहेर मालकी हक्क आहे.त्यामुळे स्टॉलधारकांनी कायदेशीर जी प्रक्रिया आहे. त्यानुसार नगरपंचायत म्हणून सहकार्य असेल. परंतु फुटपाथवर असणारे अतिक्रमण पूर्णत: हटवले जाईल , असे सांगितले.
यावेळी संदेश पारकर यांनी कणकवली शहरात स्वच्छता राखण्यासाठी व शहरातील विकासात्मक प्रयत्नाला सर्वांनी सहकार्य करा , असे आवाहन केले.
