दोडामार्गातील वीज समस्यांवर ५ जूनला निर्णायक बैठक…

ग्राहक, व्यापारी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन*

⚡दोडामार्ग,ता.०४-: दोडामार्ग तालुक्यातील वीज ग्राहकांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांवर चर्चा करून त्यावर ठोस मार्ग काढण्यासाठी वीज ग्राहक संघटना, व्यापारी संघटना आणि कसई-दोडामार्ग नगरपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. ही बैठक शुक्रवार, दिनांक ५ जून रोजी दुपारी ३ वाजता कसई-दोडामार्ग नगरपंचायत सभागृहात होणार आहे.

या बैठकीस कुडाळ अभियंता कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी, दोडामार्ग वीज विभागाचे अभियंता, सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय लाड, संघटनेचे समन्वयक ॲड. नंदन वेंगुर्लेकर, कसई-दोडामार्ग नगरपंचायतीचे नगराध्यक्ष चेतन चव्हाण, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सागर शिरसाट तसेच वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष सुभाष दळवी उपस्थित राहणार आहेत.

दोडामार्ग तालुक्यात वारंवार होणारी वीज खंडित होणे, कमी दाबाचा वीजपुरवठा, ट्रान्सफॉर्मर बिघाड, पावसाळ्यात उद्भवणाऱ्या अडचणी तसेच ग्राहकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत नागरिकांना थेट अधिकाऱ्यांसमोर आपली भूमिका मांडण्याची संधी या बैठकीत मिळणार आहे.

वीज ग्राहक संघटना, व्यापारी संघटना आणि कसई-दोडामार्ग नगरपंचायत यांनी तालुक्यातील सर्व वीज बाधित, वीज समस्याग्रस्त ग्राहक, व्यापारी, शेतकरी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या समस्या मांडाव्यात, असे आवाहन केले आहे.

दोडामार्ग तालुक्यातील वीज प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी ही बैठक महत्त्वपूर्ण ठरणार असल्याने नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

You cannot copy content of this page