हिंदळेत ‘भैरव मालवणी मसाला’ गृहउद्योगाचा शुभांरभ…

⚡देवगड ता.०४-:
महिलांनी आत्मनिर्भरतेच्या दिशेने टाकलेल्या या पावलाचे कौतुक करत ग्रामीण भागातील महिलांनी उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करण्याचे आवाहन केले. तसेच स्थानिक उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी सर्व स्तरांतून सहकार्य करण्याची ग्वाहीही यावेळी जिल्हा परिषद सदस्य सुनील पारकर यांनी दिली.
ग्रामीण भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करून त्यांचे उपजीविकेचे स्रोत अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने उमेद अभियानांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या भैरवी स्वयंसहायता समूहाला वनराई फाउंडेशनच्या माध्यमातून मसाला प्रक्रिया युनिट उपलब्ध करून देण्यात आले. या युनिटच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या ‘भैरव मालवणी मसाला’ गृहउद्योगाचा शुभारंभ जिल्हा परिषद सदस्य सुनील पारकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून व उपसभापती यांचे असते फीत कापून आज हिंदळे येथे करण्यात आले. त्याप्रसंगी पारकर बोलत होते.यावेळी देवगड पंचायत समितीचे उपसभापती अमोल लोके, हिंदळे गावचे सरपंच (प्रशासक) मकरंद शिंदे, उमेद तालुका अभियान व्यवस्थापक हेमंत हळदणकर, वनराई फाउंडेशनच्या प्रतिनिधी तसेच भैरवी स्वयंसहायता समूहातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

 ग्रामीण महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांपैकी हा एक महत्त्वपूर्ण उपक्रम मानला जात असून, स्वयंसहायता समूहातील महिलांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल असल्याचे मत उपसभापती अमोल लोके यांनी व्यक्त केले. 

तर वनराई फाउंडेशनमार्फत उपलब्ध करून देण्यात आलेल्या या मसाला प्रक्रिया प्रकल्पाचे एकूण मूल्य सुमारे तीन लाख रुपये इतके आहे.उमेद अभियानांतर्गत कार्यरत असलेल्या स्वयंसहायता समूहांमधील महिलांना विविध शासकीय विभाग, स्वयंसेवी संस्था आणि उद्योग क्षेत्राशी कृतीसंगम घडवून आणत व्यवसायाच्या संधी निर्माण करणे तसेच त्यांची उपजीविका अधिक शाश्वत आणि सक्षम करणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. त्याच अनुषंगाने भैरवी स्वयंसहायता समूहाला प्रदान करण्यात आलेले हे मसाला प्रक्रिया युनिट महिलांच्या उद्योजकीय प्रवासाला नवी दिशा देणारे ठरणार असल्याचे प्रतिपादन यावेळी सरपंच मकरंद शिंदे यांनी केले.

‘भैरव मालवणी मसाला’ या गृहउद्योगाच्या माध्यमातून स्थानिक स्तरावर दर्जेदार मालवणी मसाल्यांचे उत्पादन होणार असून, त्यातून समूहातील महिलांना रोजगार, उत्पन्नवाढ आणि आर्थिक स्थैर्य प्राप्त होण्यास मदत होणार आहे. महिलांच्या सामूहिक प्रयत्नांतून उभा राहिलेला हा उद्योग ग्रामीण उद्योजकतेचा आदर्श ठरेल, असा विश्वास यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला. या प्रकल्पासाठी हिंदळे ग्राम संघ अध्यक्ष श्रीमती शितल गिरकर सीआरपीसी मध्ये समता राणे,व मानवी राणे यांनी विशेष प्रयत्न केले.

You cannot copy content of this page