मालवणमधील ट्रॅव्हल व्यावसायिक रुपेश कुर्ले याची गळफास घेऊन आत्महत्या…

⚡मालवण ता.०१-:
मालवण वायरी भूतनाथ येथे एका भाड्याच्या खोलीत एकटाच राहणाऱ्या ट्रॅव्हल व्यावसायिक रुपेश विष्णू कुरले (वय ३९, मूळ रा. सर्जेकोट, मालवण; सध्या रा. वायरी भूतनाथ, मालवण) याने बेडशीटच्या साहाय्याने छताच्या पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेमुळे मालवणात हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रुपेश कुर्ले हा गेल्या १० वर्षांपासून वायरी भूतनाथ येथे भाड्याची खोली घेऊन एकटाच राहत होता, तर त्याची पत्नी रेश्मा ही आपल्या दोन मुलींसह मूळ गावी सर्जेकोट येथे राहते. काल रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास रुपेशचे मॅनेजर अक्षय सरमळकर यांनी रुपेशच्या खोलीचा दरवाजा उघडत नसल्याची माहिती त्याचा भाऊ महेश कुरले यांच्याकडे चालक म्हणून काम करणारे वैभव कल्याण आजगावकर (वय २९, रा. सर्जेकोट) यांना फोनवरून दिली.

मॅनेजरचा फोन आल्यानंतर वैभव आजगावकर तातडीने वायरी भूतनाथ येथील रुपेशच्या खोलीवर पोहोचले. तेथे दरवाजा आतून बंद असल्याने त्यांनी खोलीच्या खिडकीतून लांब काठी घालून दरवाजाची कडी आतून उघडली. आत जाऊन पाहिले असता रुपेश याने किचनमधील पंख्याच्या हुकाला बेडशीट बांधून गळफास घेतल्याचे धक्कादायक चित्र समोर आले.

हा प्रकार उघडकीस येताच नातेवाईक आणि शेजाऱ्यांच्या मदतीने रुपेशला तातडीने खाली उतरवून ग्रामीण रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती तो रुग्णालयात आणण्यापूर्वीच मृत झाल्याचे घोषित केले.

या प्रकरणी वैभव आजगावकर यांनी मालवण पोलीस ठाण्यात खबर दिली आहे. त्यानुसार मालवण पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास मालवण पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल जनार्दन रेवंडकर करत आहेत. रुपेशच्या आत्महत्येमागचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.

You cannot copy content of this page