भाई देऊलकर यांच्या पाठपुराव्याला यश; तहसीलदार श्रीपाद पाटील यांचे अभिनंदन..
⚡सावंतवाडी ता.२७-: सामाजिक कार्यकर्ते तथा सिंधुसागर पर्यटन प्रबोधिनीचे संस्थापक वासुदेव सहदेव उर्फ भाई देऊलकर यांच्या विनंती निवेदनानुसार सावंतवाडी तहसीलदार कार्यालय परिसराच्या सुशोभीकरणाच्या कामाला सुरुवात झाली आहे. तहसीलदार कार्यालय इमारतीची रंगरंगोटी सुरू करण्यात आली असून कार्यालयासमोरील संरक्षण भिंत उभारून तेथे आकर्षक गार्डन विकसित करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार श्रीपाद पाटील यांनी दिली.
भाई देऊलकर हे सामाजिक, पर्यटन व ग्रामीण विकास क्षेत्रात कार्यरत असलेले ज्येष्ठ आंदोलनात्मक नेतृत्व म्हणून परिचित आहेत. विविध सामाजिक संघटनांच्या माध्यमातून त्यांनी ग्रामीण भागातील नागरिकांसाठी अनेक उपक्रम राबविले आहेत. निसर्ग संवर्धन व पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील असतात. गतवर्षी त्यांनी देहदानाची घोषणाही करून सामाजिक बांधिलकीचे उदाहरण घालून दिले होते.
सावंतवाडी तहसीलदार कार्यालय परिसराची झालेली दुरवस्था पाहून भाई देऊलकर यांनी १७ सप्टेंबर २०२५ रोजी तहसीलदार श्रीपाद पाटील यांना निवेदन सादर केले होते. त्यामध्ये इमारतीची रंगरंगोटी, परिसर सुशोभीकरण तसेच समोर गार्डन उभारण्याची मागणी करण्यात आली होती. तहसीलदार श्रीपाद पाटील यांनी या मागणीचा सकारात्मक विचार करून पाठपुरावा केला आणि त्यानुसार कामांना प्रारंभ झाला आहे.
या कामाची दखल घेत भाई देऊलकर यांनी तहसीलदार श्रीपाद पाटील यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे सदस्य रवी जाधव, कर्मचारी तसेच नागरिक उपस्थित होते.
