मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मनापासून आभार: बबन साळगावकर..
⚡सावंतवाडी ता.२६-: सावंतवाडी रेल्वे टर्मिनसला “लोकमान्य मधु दंडवते रेल्वे टर्मिनस” असे नामकरण करण्यास महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्य मंत्रिमंडळाचे सर्व स्तरांतून आभार व्यक्त करण्यात येत आहेत.
या निर्णयामुळे सावंतवाडी परिसरातील नागरिकांचे अनेक वर्षांचे स्वप्न अखेर पूर्ण झाल्याची भावना व्यक्त होत आहे.
सावंतवाडी रेल्वे टर्मिनससाठी स्वर्गीय माजी आमदार जयानंद मटकर यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक नागरिकांनी आंदोलन सुरू केले होते. त्यांच्या निधनानंतर हे आंदोलन त्यांचे नातू मिहीर मटकर यांनी पुढे नेले. या लढ्यात सावंतवाडी रेल्वे टर्मिनस समितीचे अध्यक्ष अॅड. संदीप निंबाळकर, मिहीर मटकर, सागर तळवडेकर, भूषण बांदिवडेकर तसेच आघाडीच्या कार्यकर्त्यांनी अभ्यासपूर्ण पाठपुरावा करत सातत्याने प्रयत्न केले.
दीर्घकाळ सुरू असलेल्या या जनआंदोलनाला अखेर यश मिळाल्याने सावंतवाडी परिसरात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयाचे स्वागत करताना आंदोलनातील सर्व प्रमुख शिलेदारांचे अभिनंदन करण्यात आले असून, “खऱ्या अर्थाने आज सावंतवाडीकरांचे स्वप्न साकार झाले,” अशी भावना व्यक्त करण्यात आली.
