आपुलकीचा पाहुणचार आणि नाट्यनिष्ठेचे दर्शन…

मांजरेकरवाडी येथे ‘पितृभक्त रावण’ मानधनाविना सादर:देवेंद्र नाईक प्रस्तुत चेंदवणकर दशावतार मंडळाचे होत आहे कौतुक..

सावंतवाडी : आपुलकीचा पाहुणचार, उत्कृष्ट उठबस, नाट्यप्रेमातून केलेले देखणे आयोजन व मांजरेकरवाडी येथील ग्रामस्थांची नाटकाप्रती असलेली धडाडी यामुळे मळगाव-मांजरेकरवाडी येथे झालेला पौराणिक नाट्यप्रयोग सर्वांच्याच चर्चेचा विषय ठरला. विशेष म्हणजे आयोजकांच्या आग्रहानंतरही कंपनीचे मालक देवेंद्र नाईक व सहकलाकारांनी मानधन न स्वीकारता नाट्यप्रयोग सादर केला. मळगाव परिसरात या निर्णयाचे विशेष कौतुक करण्यात येत आहे.
मळगाव-मांजरेकरवाडी येथे शुक्रवार (२२ मे) रोजी देवेंद्र नाईक पुरस्कृत चेंदवणकर दशावतार नाट्य मंडळ यांचा ‘पितृभक्त रावण’ हा पौराणिक नाट्यप्रयोग सादर करण्यात आला. पारंपरिक दशावतार कलेचा सशक्त आविष्कार, प्रभावी अभिनय आणि देखण्या सादरीकरणामुळे नाट्यप्रेमींचा या प्रयोगाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. नाट्यप्रयोगाच्या निमित्ताने मांजरेकरवाडी आयोजकांच्यावतीने दहावी परीक्षेत यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच लोकप्रिय राजा उदय राणे-कोनसकर, कंपनीचे मालक देवेंद्र नाईक आणि या कंपनीत कार्यरत असलेले मळगावचे सुपुत्र रत्नाकर मांजरेकर यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. या नाट्यप्रयोगाच्या यशस्वी आयोजनासाठी अनेक नाट्यप्रेमींनी सढळ हस्ते मदत केली. त्यांच्या सहकार्यामुळे कार्यक्रम सुरळीत व प्रभावीपणे संपन्न झाला. याबद्दल आयोजकांच्या वतीने सर्व मदतदारांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.
दरम्यान, या प्रयोगादरम्यान एक आगळीवेगळी आणि दुर्मिळ घटना घडली. कंपनीचे मालक देवेंद्र नाईक व त्यांच्या संचाने आयोजकांच्या वारंवार आग्रहानंतरही या नाट्यप्रयोगाचे मानधन स्वीकारण्यास नम्र नकार दिला. ग्रामदेवतेच्या आशीर्वादाने आणि आयोजकांनी केलेला पाहुणचार, उठबस, आयोजन या प्रेमामुळेच हा प्रयोग मोफत सादर केल्याचे त्यांनी सांगितले. अशा प्रकारची घटना यापूर्वी कधीही ऐकिवात नसल्याने मळगाव परिसरात या निर्णयाचे कौतुक होत आहे.

You cannot copy content of this page