चार लाखांच्या औषधांचे मोफत वाटप..
⚡मालवण ता.२०-:
जागृत उन्नती मंडळ आणि सिपन प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने त्रिंबक येथील जनता विद्या मंदिर येथे भव्य महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न झाले. या शिबिराचे उद्घाटन मान्यवर डॉ. विद्याधर तायशेटे यांच्या हस्ते करण्यात आले.
या महाआरोग्य शिबिरासाठी सतराहून अधिक तज्ज्ञ डॉक्टरांची उपस्थिती लाभली होती. पंचक्रोशीतील अनेक वृद्ध, महिला तसेच बालकांनी शिबिराचा मोठ्या प्रमाणात लाभ घेतला. सिपन प्रतिष्ठान यांनी तज्ज्ञ डॉक्टरांची टीम उपलब्ध करून दिली होती. तसेच त्रिंबक येथील प्रसिद्ध डॉ. सिद्धेश सकपाळ व त्यांच्या सहकाऱ्यांनी संपूर्ण शिबिराचे उत्कृष्ट नियोजन केले.
शिबिरात सुमारे चार लाख रुपयांच्या औषधांचे मोफत वाटप करण्यात आले. तसेच श्री नामदेव साटम यांच्या सहकार्याने शंभरहून अधिक नागरिकांना मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले.
या उपक्रमासाठी जागृत उन्नती मंडळ च्या मुंबई तसेच स्थानिक शाखेतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. शिबिराचा समारोप डॉ. संदीप कदम यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनाने झाला. या महाआरोग्य शिबिरामुळे त्रिंबक परिसरातील नागरिकांना दर्जेदार वैद्यकीय सेवा मोफत उपलब्ध झाल्याने समाधान व्यक्त करण्यात आले.
