दिलीप गिरप ; 24 ते 26 मे या कालावधीत ‘मोफत मराठी चित्रपट महोत्सव’चेही आयोजन..
⚡वेंगुर्ला ता.१३-: वेंगुर्ला नगरपरिषद शतकोत्तर सुवर्ण महोत्सव वर्षानिमित्त बुधवार दिनांक 20, 21 व 22 मे रोजी भव्य “सांस्कृतिक महोत्सवा”चे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासन सांस्कृतिक विभागामार्फत होणाऱ्या या महोत्सवाचे उदघाट्न बुधवार दि. 20 मे रोजी सायंकाळी 7.30 वा. सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते होणार आहे. याबाबत वेंगुर्ला नगरपरिषद छत्रपती शिवाजी महाराज सभागृह येथे नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सभेत निर्णय घेण्यात आला. वेंगुर्ला नगरपरिषदची विशेष सभा नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी संपन्न झाली. यावेळी मुख्याधिकारी हेमंत किरुळकर, नगरसेवक प्रणव वायंगणकर, रवी शिरसाट, संदेश निकम, प्रीतम सावंत, सुधीर पालयेकर, दाजी परब, सदानंद गिरप, सचिन शेट्ये, युवराज जाधव, विनय नेरुरकर, प्रशांत आपटे, नगरसेविका गौरी मराठे, आकांक्षा परब, सुषमा प्रभूखानोलकर, शितल आंगचेकर, रिया केरकर काजल कुबल, समिधा रेडकर, गौरी माईणकर आदी उपस्थित होते.वेंगुर्ला नगरपरिषदेला 150 वर्षाचा इतिहास आहे. यनिमित्त वेंगुर्ला शहरात हा भव्य महोत्सव होणार असून यासाठी मंत्री, खासदार, आमदार व विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यनिमित्त दाभोली नाका वेंगुर्ला नगरपरिषद ते नगरपरिषद स्टेडियम पर्यंत भव्य शोभायात्रा, चित्ररथ स्पर्धा, कळसूत्री बाहुल्यांचा कार्यक्रम, संयुक्त दशावतार, स्थानिक कलाकारांचे लोककला कार्यक्रम, लोककलावर आधारित नामवंत गायकांचा आर्केस्ट्रा व विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. यावेळी जिल्हाधिकारी, आजी -माजी नगराध्यक्ष, आजी -माजी नगरसेवक,कर्मचारी, आजी माजी मुख्याधिकारी, जिल्ह्यातील सर्व नगरपरिषद / नगरपालिका नगराध्यक्ष, मुख्याधिकारी यांचा सत्कार करण्यात येणार आहे.तसेच वेंगुर्ला नगरपरिषद शतकोत्तर सुवर्णमहोत्सव सांगता समारंभ निमित्ताने दि.24-25-26 मे या कालावधीत नाटककार मधुसूदन कालेलकर सभागृह येथे ‘ मराठी चित्रपट महोत्सव ‘ चे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सर्वोत्कृष्ट 8 चित्रपटांचे सादरीकरण होणार असून नागरिकांना ‘मोफत’ चित्रपट पाहण्याची संधी मिळणार आहे. दरम्यान 4 कमिट्या स्थापन करून उत्कृष्ट चित्रपट निश्चिती करण्यात येणार आहे.तसेच मंत्री यांच्या हस्ते 150 वर्षाचा वेंगुर्ला चा इतिहास याबाबत ‘विशेष पुस्तक प्रकाशन’ करण्यात येणार आहे. तसेच 150 वर्षाच्या इतिहासाची डॉक्युमेंटरी सादर करण्यात येणार आहे, अशी माहिती नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी सभागृहात दिली.
