६० लाखांचा निधी मंजूर; पर्यायी पायवाट,: पार्किंग सुविधा व सांडपाण्याच्या समस्येतून नागरिकांना दिलासा, नगरसेवक देव्या सूर्याजी यांची माहिती..
सावंतवाडी : सावंतवाडी नगरपरिषद हद्दीतील कळसुलकर हायस्कूल ते निंबाळकर पीरकडे जाणाऱ्या नाल्याचे बांधकाम करून तो बंदिस्त करण्याच्या महत्त्वपूर्ण कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. नगरसेवक देव्या सुर्याजी यांनी याबाबतची माहिती दिली आहे. या कामामुळे परिसरातील नागरिकांनी अतिरिक्त पायवाट उपलब्ध होणार असून बंदीस्त नाल्यामुळे सांडपाण्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्याही मिटणार आहे. यासाठी स्थानिक नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
या नाल्याच्या दुरुस्तीसाठी आणि तो बंदिस्त करण्यासाठी युवा रक्तदाता संघटनेच्यावतीने सातत्याने पाठपुरावा करण्यात आला होता. संघटनेने राज्याचे उप मुख्यमंत्रीतथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे या कामाची मागणी केली होती. या पाठपुराव्याची दखल घेत नगरविकास विभागाकडून या कामासाठी ६० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या कामाच्या प्रारंभ झाल्याची माहिती नगरसेवक श्री. सुर्याजी यांनी देत कामाची पाहाणी केली. यावेळी संबंधित कंत्राटदाराला कामाचा दर्जा उत्तम राखण्याच्या आणि काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. हे काम सार्वजनिक हिताचे असून यात कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही, असेही नगरसेवक देव्या सुर्याजी यांनी यावेळी स्पष्ट केले.या कामामुळे पर्यायी पायवाट मिळणार असूनच दुचाकी पार्किंगसाठी अतिरिक्त जागेची भर पडणार आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीवर देखील पर्याय निघणार आहे. या भागातील मच्छी मार्केट आणि सालईवाडा परिसरातील नागरिकांनी गेल्या अनेक वर्षांपासून या नाल्याचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली होती. अखेर निधी उपलब्ध होऊन काम सुरू झाल्याबद्दल नागरिकांनी तत्कालीन मुख्यमंत्री व विद्यमान उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार दीपक केसरकर यांचे आभार मानले आहेत.
