करुळ येथील धरणात बुडून तीन मुलींचा दुर्दैवी अंत : वैभववाडी हादरली…

मयत तन्वी माळकर नुकतीच झाली होती दहावी पास.

⚡वैभववाडी ता.१३-: करुळ येथील धरणात बुडून तीन मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. एकूण सात मुले धरणावर गेले होते. यातील तीघीजणी अंघोळीसाठी पाण्यात उतरल्या होत्या. तिघांचाही अंत झाला आहे. तन्वी अनंत माळकर वय 16 रा. करुळ भोयडेवाडी, स्वरा संदीप सुर्वे वय 11 रा. कुसुर, ऋतिका संतोष पाटील वय 18 रा. करूळ भोयडेवाडी अशी मयत मुलींची नावे आहेत. या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यावर शोककाळा पसरली आहे. या घटनेची माहिती मिळताच वैभववाडी पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. स्थानिकांच्या मदतीने तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले. मयत तन्वी अनंत माळकर ही नुकतीच दहावी उत्तीर्ण झाली होती.
करूळ भोयडेवाडी येथील विलास काशीराम वारंग यांच्या आईचे नुकतेच निधन झाले. बुधवारी त्यांच्या घरी बारावा दिवसाचे कार्य होते. दुपारी कार्यक्रम आटोपल्यानंतर विलास वारंग यांचा मुलगा करण विलास वारंग, मुलगी ऋतिका विलास वारंग, भाची स्वरा संदीप सुर्वे, जार्गवी संदीप सुर्वे, तसेच तन्वी अनंत माळकर ऋतिक संतोष पाटील, विराज संतोष पाटील असे एकूण सात जण करूळ मंदिरनजीकच्या धरणावर अंघोळीसाठी गेले होते. तन्वी अनंत माळकर, स्वरा संदीप सुर्वे, ऋतिका संदीप पाटील या धरणातील पाण्यात अंघोळीसाठी उतरल्या. अंघोळ करत असताना त्या फोटोही काढत होत्या. या तिघींना पाण्याचा अंदाज न आल्याने त्या बुडाल्या. उर्वरित दोघांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांचे प्रयत्न अयशस्वी ठरले. दरम्यान करण याने वडील विलास वारंग यांना कॉल केला. व घडलेली घटना सांगितली. विलास वारंग हे नजीक असलेल्या मंदिरात होते. त्यांनी तात्काळ धरणाकडे धाव घेतली. त्यांच्यासोबत यश देवेंद्र पवार, आकाश रवींद्र सुर्वे, सुशील रामकृष्ण माळकर, संजय रामकृष्ण वारंग संजय हरिचंद्र वारंग, बाळकृष्ण बाबाजी वारंग यांनी घटनास्थळी धाव घेतली. या सर्वांनी त्या तिन्ही मुलींना पाण्यातून बाहेर काढले. मात्र त्यांचा मृत्यू झाला होता.
या घटनेची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरली. स्थानिकांनी धरणावर तात्काळ धाव घेतली. वैभववाडी पोलीस हरेष जायभाय, श्री अजय बिल्पे, श्री धडे, श्री सावंत व पोलीस श्री हाके यांनी घटनास्थळी धाव घेतली. ग्रामीण रुग्णालयाची रुग्णवाहिका ही घटनास्थळी दाखल झाली होती. महसूल चे नायब तहसीलदार दिलीप पाटील, मंडल अधिकारी गवस, तलाठी, ग्रामसेवक ही घटनास्थळी उपस्थित होते. वैभववाडी भाजपा अध्यक्ष सुधीर नकाशे, जिल्हा बँक माजी संचालक दिगंबर पाटील, उपसभापती साची कोलते, पंचायत समिती सदस्य देवानंद पालांडे घटनास्थळी दाखल झाले होते.
मयत तन्वी अनंत माळकर हि गावातील माध्यमिक विद्यालय करूळ या प्रशालेत शिकत होती. यावर्षी तिने दहावीची परीक्षा देऊन उत्तीर्ण ही झाली होती. मात्र तिच्यावर काळाने घाला घातला आहे. या घटनेने अनंत माळकर कुटुंबावर तसेच पाटील व सुर्वे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याचबरोबर स्वरा संदीप सुर्वे रा. कुसुर सध्या रा. मुंबई ही मुलगी इयत्ता सातवीमध्ये शिकत होती. ती आजीच्या बाराव्याच्या कार्यासाठी मामाच्या गावी आली होती.
या घटनेने करुळ गावावर शोककाळा पसरली आहे. तिघांचेही मृतदेह शवविच्छेदनसाठी येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहेत. या घटनेची नोंद वैभववाडी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

You cannot copy content of this page