*डेगवे मिरेखन शाळेचा सुवर्ण महोत्सव उत्साहात…

⚡बांदा ता.१२-: डेगवे मिरेखन येथील जिल्हा परिषद शाळेच्या या सुवर्ण महोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेला भव्य सोहळा उत्साह, आनंद आणि भावनांनी ओतप्रोत भरलेल्या वातावरणात पार पडला. गेली पन्नास वर्षे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे कार्य करत अनेक विद्यार्थ्यांचे भविष्य घडविणाऱ्या या शाळेच्या सुवर्ण प्रवासाचा गौरव ग्रामस्थ, माजी विद्यार्थी, शिक्षक आणि मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या दिमाखात करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे माजी शिक्षण व मराठी भाषा राज्यमंत्री तथा आमदार दीपक केसरकर उपस्थित होते. आपल्या मनोगतात त्यांनी शाळेच्या प्रगतीचे कौतुक करत ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्था सक्षम करण्यासाठी अशा शाळांचे योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे सांगितले. “गावातील शाळा ही केवळ शिक्षणाची संस्था नसून संस्कारांचे केंद्र असते. अशा संस्थांमधूनच समाजाला दिशा देणारी पिढी घडते,” असे प्रतिपादन त्यांनी केले.
सुवर्ण महोत्सवानिमित्त शाळेच्या पन्नास वर्षांच्या वाटचालीचा आढावा घेण्यात आला.या वेळी मान्यवरांच्या हस्ते शाळेच्या स्मरणिकेचे प्रकाशनही करण्यात आले.महिलांच्या सुप्त कला गुणांना वाव देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या खेळ पैठणी या स्पर्धेतील यशस्वी महिलांना जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांच्या हस्ते पैठणी साड्या देऊन गौरविण्यात आले.
यावेळी सभापती सुष्मिता जाधव, सरपंच राजन देसाई , उपसरपंच मंगेश देसाई, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उमेश कोकरे, उपाध्यक्ष राजन सावंत ,माजी सभापती भगवान देसाई,माजी उपसभापती कृष्णा सावंत आदि मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मुख्याध्यापक आनंद कोळापटे, सहकारी शिक्षक सौरभ खोत,ग्रामपंचायत सदस्य सुरेश वराडकर, रुपाली देसाई, राजेश देसाई, प्रगती देसाई , माजी सरपंच वैदेही देसाई , मंगलदास देसाई, मधूकर देसाई, प्रवीण देसाई,माजी विद्यार्थी संघ अध्यक्ष
अक्षय सावंत, उपाध्यक्ष धोंडू कोकरे,तंटामुक्ती अध्यक्ष उत्तम देसाई, ग्रामसेवक वीणा धुरी, सावळाराम सावंत, मनोज देसाई, भीमसेन देसाई,श्रुती शेटवे, हेमंत सावंत, अंगणवाडी सेविका विद्या देसाई ,अक्षरा सावंत व समीक्षा सावंत आदिंनी कार्यक्रमाचे नियोजन प्रभावीपणे हाताळत संपूर्ण सोहळा संस्मरणीय केला. या दिवशी संध्याकाळी महिलांसाठी खेळ पैठणीचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे निवेदन राज्य आदर्श शिक्षक जे.डी.पाटील व आबाजी सावंत यांनी केले.रात्री दशावतार गणेश महिमा हा नाट्यप्रयोग सादर झाला. या वेळी शाळेच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमाला व स्मरणिकेसाठी अमूल्य अशी मदत देऊन सहकार्य केलेल्या सर्वांचे आभार मानण्यात आले.कार्यक्रमाला डेगवे,विलवडे,भालावल तसेच परिसरातील गावांतील शिक्षणप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते
शिक्षण, संस्कार आणि ग्रामएकतेचा सुंदर संगम अनुभवायला मिळालेला हा सुवर्ण महोत्सव डेगवे गावासाठी अभिमानाचा आणि कायम स्मरणात राहणारा ठरला.

You cannot copy content of this page