परांजपे कुटुंबाच्या समस्येची अखेर दखल..

सभापती मोहिनी मडगावकर घटनास्थळी, पर्यायी रस्त्याचे आश्वासन..

⚡सावंतवाडी ता.११-: सहा महिने प्रशासनाकडे विनवणी करूनही दखल घेतली न गेल्याने येथील परांजपे कुटुंबाने आपली कैफियत मांडली. यानंतर आज स्थानिक नगरसेविका तथा सभापती मोहिनी मडगावकर यांनी अधिकाऱ्यांसह घटनास्थळी जात पाहाणी केली. ज्येष्ठ नागरिकांना न्याय मिळवून देण्यासह पर्यायी रस्ता देखील न.प.कडून उपलब्ध करून देण्यासाठी बैठकीत भूमिका मांडणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

प्रसिद्ध झालेल्या वृत्तानंतर स्थानिक नगरसेविका, सभापती सौ. मडगावकर यांनी त्याची दखल तात्काळ परांजपे कुटुंबाची भेट घेतली. यावेळी प्रा. गिरीधर परांजपे व विजय परांजपे यांच्याशी चर्चा करून त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. यावेळी सौ. मडगावकर यांनी संबंधित बिल्डरला बोलावून घेत खडेबोल सुनावले. ना दुरूस्त झालेल्या भेगा गेलेल्या पायऱ्या तात्काळ करून देण्यासह बाजूच्या परिसरात माती टाकण्याची सुचना त्यांनी केली. संबंधित बिल्डरकडून ती मान्य करत उद्यापासून काम करण्याचे मान्य केले.

दरम्यान, ज्येष्ठ नागरिक असल्याने व रस्ता नसल्याने घरापर्यंत रस्ता मिळावा‌ यासाठी सभापती सौ. मडगावकर यांनी पुढाकार घेतला आहे. श्री. परांजपे यांच्या घरामागील ओहोळावर स्लॅब घालून पर्यायी रस्ता त्यांना दिला जाईल, ज्येष्ठ नागरिक असल्याने येत्या बैठकीत हा विषय मांडून लवकरात लवकर या कामाला मंजुरी घेऊन ते काम पूर्णत्वास आणू अशी ग्वाही त्यांनी दिली. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता तुषार सरडे, श्री. बुगड, श्री. राऊळ उपस्थित होते. तसेच या वृत्ताची दखल घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष ॲड अनिल केसरकर व शहराध्यक्ष ॲड राजू कासकर यांनी परांजपे कुटुंबाची भेट घेतली. नगरपरिषदेच्या माध्यमातून न्याय द्यावा अशी विनंती यावेळी त्यांनी सभापती सौ. मडगावकर यांना केली. तसेच नगराध्यक्षा युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले यांनी देखील या घटनेची दखल घेतली असून यावर मार्ग काढण्यासाठी कार्यवाहीचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत.

You cannot copy content of this page