वैभव नाईक:कळसुली इंग्लिश स्कूलच्या माजी विद्यार्थी स्नेहमेळाव्याला उस्फुर्त प्रतिसाद..
⚡कणकवली ता.११-: ग्रामीण भागातील कळसुली इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स ॲण्ड आर्ट्स हि शिक्षण संस्था या केवळ शाळा नसून त्या समाज परिवर्तनाची केंद्रे आहेत. १९६६ साली स्थापन झालेल्या कळसुली शिक्षण संस्थेने गेल्या अनेक दशकांत हजारो गुणवंत विद्यार्थी घडवून समाजाला दिशा दिली आहे. मात्र आज ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्था संकटात सापडत असून शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे शिक्षण संस्था टिकविण्यासाठी समाजाने पुढे येण्याची गरज आहे, असे प्रतिपादन माजी आमदार वैभव नाईक यांनी केले.
कळसुली इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स ॲण्ड आर्ट्स हायस्कूलच्या माजी विद्यार्थी व परिवार स्नेहमेळाव्याच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटन वैभव नाईक यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. सरस्वती पूजन कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या हस्ते करण्यात आले. स्वागतगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
यावेळी व्यासपीठावर माजी आमदार वैभव नाईक, कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर, अध्यक्ष माजी विद्यार्थी संघ मुंबई भालचंद्र दळवी, अध्यक्ष कळसुली शिक्षण संघ सूर्यकांत दळवी, कार्याध्यक्ष कळसुली शिक्षण संघ विजय सावंत, माजी जिल्हा परिषद जिल्हापरिषद अध्यक्ष आर. बी.दळवी, चेअरमन स्कूल कमिटी के आर दळवी, मुख्याध्यापक व्ही. व्हि. वगरे, माजी जिल्हा परिषद सदस्या सुगंधा दळवी, कृषी शास्त्रज्ञ विजय सावंत, विजय दळवी, कमलाकर राणे, शिवराम सुतार, बापू खरात , माजी व्हाईस चेअरमन डी. जी. तेली, गोविंद वारंग, अरविंद दळवी, ग्रामपंचायत सदस्य नंदकिशोर परब, ग्रामपंचायत सदस्य भारती देसाई ,दशरथ परब, अंकुश परब, कांता देसाई, एस. के. सावळ, रामचंद्र नाईक, माजी मुख्याध्यापक एस. एस. दळवी,माजी विद्यार्थी आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
वैभव नाईक पुढे म्हणाले की, “आज आपण ज्या शाळेचा अभिमान बाळगतो, ती संस्था उभारण्यामागे तत्कालीन शेतकरी कुटुंबातील सामान्य लोकांचे मोठे योगदान आहे. सत्तर ते शंभर वर्षांपूर्वी ग्रामीण भागात शिक्षणाची साधने नव्हती. त्या काळात शिक्षणाचे महत्त्व ओळखून गावातील लोकांनी शाळा उभी करण्याचे स्वप्न पाहिले. ही त्यांची दूरदृष्टी आणि समाजाप्रती असलेली बांधिलकी होती.”
ते म्हणाले, “कणकवलीत एस.एम. हायस्कूलनंतर उभी राहिलेली ही संस्था आज शिक्षणाच्या क्षेत्रात वेगळा ठसा उमटवत आहे. कळसुलीतील प्रत्येक घरात एखादा उच्चशिक्षित व्यक्ती दिसतो आणि त्याचे श्रेय या संस्थेला जाते. सिंधुदुर्ग जिल्हा हा गुणवंत विद्यार्थ्यांचा जिल्हा म्हणून आजही ओळखला जातो.”
“शिक्षण व्यवस्था बिकट होत चालली”
ग्रामीण भागातील शिक्षणाबाबत चिंता व्यक्त करताना वैभव नाईक म्हणाले, “आज दुर्दैवाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षणाची अवस्था हळूहळू बिकट होत चालली आहे. कमी पटसंख्येमुळे अनेक वर्ग बंद केले जात आहेत. ज्या वर्गात २० विद्यार्थी नाहीत, ते वर्ग बंद करण्याचा निर्णय घेतला जात आहे. गेल्या चार वर्षांत जिल्ह्यात १५० पेक्षा जास्त प्राथमिक शाळा बंद झाल्या आहेत. तसेच अनेक वर्ग रद्द करण्यात आले आहेत.”
लोकसंख्या घट आणि स्थलांतर यामुळे ग्रामीण भागातील शाळांवर परिणाम होत असल्याचे त्यांनी नमूद केले. “व्यवसाय आणि रोजगाराच्या निमित्ताने लोक शहरांकडे स्थलांतर करत आहेत. त्यामुळे गावांतील लोकसंख्या कमी होत असून शाळांनाही त्याचा फटका बसत आहे,” असे त्यांनी सांगितले.
धरण प्रकल्पांमुळे गावांच्या विकासाला चालना
गावांच्या विकासासाठी जलस्रोत महत्त्वाचे असल्याचे सांगताना त्यांनी आपल्या आमदारकीच्या काळात मंजूर करण्यात आलेल्या विविध धरण प्रकल्पांचा उल्लेख केला. “आंब्रड, कळसुली, भडगाव आणि घोडगे परिसरात धरण प्रकल्प सुरू करण्यात आले आहेत. भविष्यात या भागाला पाण्याची मोठी उपलब्धता होणार असून गावांची समृद्धी वाढेल,” असे त्यांनी स्पष्ट केले.
“कळसुली शिक्षण संघ आज ब्रँड” नं.१
नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी आपल्या भाषणात कळसुली शिक्षण संघाच्या कार्याचे कौतुक केले. ते म्हणाले, “कळसुली शिक्षण संघ हा आज एक ब्रँड बनला आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत ग्रामीण विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे या उद्देशाने संस्थेने गेली ६७ वर्षे सातत्याने कार्य केले आहे.”
“या प्रशालेतून घडलेले विद्यार्थी आज सामाजिक, शैक्षणिक, प्रशासकीय, व्यावसायिक आणि विविध क्षेत्रांत यशस्वीपणे कार्यरत आहेत. समाजाची जडणघडण घडविण्याचे मोठे काम या संस्थेने केले आहे,” असेही त्यांनी नमूद केले.
स्पर्धेच्या युगात शिक्षण संस्थांनी आपले अस्तित्व टिकवून ठेवणे महत्त्वाचे असल्याचे सांगत त्यांनी कळसुली प्रशालेने आपली यशस्वी परंपरा कायम ठेवली असल्याचे गौरवोद्गार काढले.
गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
यावेळी ७५ वर्षांवरील माजी विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच दहावी व बारावी परीक्षेत प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. माजी विद्यार्थी, ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती कार्यक्रमाला लाभली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशांत दळवी यांनी केले तर सूत्रसंचालन आनंद सावंत यांनी केले.
