⚡दोडामार्ग ता.०८-: सोनावल, तेरवण-मेढे तसेच पाळये परिसरात गुरुवारी सायंकाळी चारच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह जोरदार वाऱ्यासोबत तब्बल दीड तास मुसळधार अवकाळी पाऊस झाला. दोन दिवसांपूर्वी हवामान खात्याने व्यक्त केलेला अंदाज अखेर खरा ठरला असून, अचानक झालेल्या या पावसामुळे परिसरातील जनजीवन काही काळ विस्कळीत झाले.
अचानक कोसळलेल्या पावसामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाली. जोरदार वाऱ्यामुळे काही ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून रस्त्यावर पडल्याच्या घटनाही घडल्या. उष्णतेच्या तीव्रतेने त्रस्त झालेल्या नागरिकांना या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला असला, तरी दुसरीकडे शेतकऱ्यांच्या चिंतेत मोठी भर पडली आहे.
सध्या काजू व आंबा हंगाम अंतिम टप्प्यात असताना अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. हाता-तोंडाशी आलेल्या काजू व आंबा पिकांना मोठा फटका बसला असून अनेक ठिकाणी आंब्यांची गळती झाली आहे. तसेच काजू बागांनाही या पावसाचा मोठा परिणाम जाणवत आहे.
या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. प्रशासनाने तत्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत व नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
“दोडामार्ग तालुक्यात अवकाळी पावसाचा तडाखा ; काजू-आंबा बागांचे मोठे नुकसान”…
