१ हजार ४०७ विद्यार्थी उत्तीर्ण ; तालुक्यातील २० विद्यालयांचा १००% निकाल..
कणकवली : कणकवली तालुक्याने यंदाच्या दहावी परीक्षेत उज्वल यश संपादन करत ९७.९८ टक्के निकालाची नोंद केली आहे. तालुक्यातील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत यशाची परंपरा कायम राखली आहे.
तालुक्यातील एकूण १ हजार ४३६ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. त्यामध्ये ७५३ मुले व ६८३ मुलींचा समावेश होता. यापैकी १ हजार ४०७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यामध्ये ७३० मुले व ६७७ मुलींचा समावेश आहे.
विद्यार्थ्यांच्या या यशामुळे पालक, शिक्षक तसेच शाळांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे तालुक्यातील तब्बल २० विद्यालयांनी शंभर टक्के निकालाची नोंद करत उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे.
यंदाच्या निकालात मुलींनीही उत्कृष्ट यश मिळवत आपली गुणवत्ता सिद्ध केली असून तालुक्याच्या शैक्षणिक प्रगतीत भर घातली आहे.
